Pune : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचे छापे

पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज- मसाज पार्लर किंवा स्पा च्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या विरोधात पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. मागील काही दिवसात पुणे शहराच्या विविध भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापे टाकून अनेक मुलींची सुटका केली तर या मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांच्या विरोधात ‘पिटा’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुण्याच्या कात्रज, विमाननगर, कल्याणीनगर, हडपसर, सोमवार पेठ भागात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी कळवले आहे.

कात्रज येथे असलेल्या किनारा हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची विश्वसनीय माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एका दोन मुलींची सुटका केली. यामध्ये एक पश्चिम बंगालची मुलगी असून दुसरी उत्तर प्रदेश मधील आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करून भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कल्याणीनगर भागातील ओक स्पा मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. या कारवाईत वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ मुलींना ताब्यात घेऊन या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडगावशेरी येथील सिद्धिविनायक कॅरोना सोसायटीमधील एका घरात वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधून याची खात्री करण्यात आली. त्यानंतर कारवाई करून एका पश्चिम बंगालच्या तरुणीची सुटका करण्यात आली. तर एका व्यक्तीच्या विरोधात विमाननगर पोलीस ठाण्यात पिटा ॲक्ट कलम 3,4,5 व भादवि कलम 370,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिजनेस सेंटर बिल्डिंगमध्ये रिलॅक्स फॅमिली स्पा येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून रिलॅक्स फॅमिली स्पा च्या महिला व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पिटा अॅक्ट कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी एका घटनेत दोन मुलींना वेश्याव्यवसायासाठी सोमवार पेठेतील हॉटेल जगन्नाथ येथे आणले जाणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करण्यात आली. त्यानंतर कारवाई करून रुकसाना रफिक शेख (वय 29 वर्ष रा. काळेपडळ, हडपसर) या महिलेसह सागर प्रकाश काळभोर (वय 20 वर्षे ,लोणी काळभोर) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून दोन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या विरोधात पीटा ॲक्ट कलम 3,4,5 व पाॅक्से ॲक्ट कलम 4,6,17  प्रमाणे कारवाई करण्यात अली आहे. आरोपीना पुढील तपासासाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.