Pune : रानडेंच्या नैतिकतेच्या विचारांतून राजकीय पक्षांनी बोध घ्यावा- डॉ. राजा दीक्षित

एमपीसी न्यूज-न्यायमूर्ती रानडे यांनी शास्त्रीय व राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवतानाच (Pune) व्यक्तिकेंद्रित इतिहासाची मांडणी टाळली. इतिहास हा वस्तुनिष्ठपणेच दिला पाहिजे. भगवे, हिरवे, लाल असे कोणतेही चष्मे वापरणे, हे इतिहासाबरोबर स्वत:वरही अन्याय करण्यासारखे आहे, याची जाणीव करून देतानाच इतिहासाची परखड चिकित्सा व समतोल मांडणी करण्याची दृष्टी रानडे यांनी दिली, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी रविवारी येथे काढले. सार्वजनिक जीवनातील नैतिकतेबाबत आग्रही असलेल्या रानडे यांच्या विचारांतून आजच्या राजकारण्यांनी व  राजकीय पक्षांनी बोध घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या ‌‘इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र’च्या वतीने ख्यातनाम इतिहास अभ्यासक प्रा. ज.वि. नाईक पुरस्कृत ‌‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व्याख्यानमाले’ त व्याख्यान देताना प्रा. दीक्षित बोलत होते. अध्यक्षस्थानी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत होते. इतिहास शिक्षक महामंडळाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब शिंदे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आदी उपस्थित होते.

प्रा. दीक्षित म्हणाले, इतिहासाच्या समग्र प्रक्रियेकडे न्यायमूर्ती रानडे हे शास्त्रीय दृष्टीने पाहत असत. मराठ्यांचा उदय केवळ जंगलात पेटलेल्या वणव्यासारखा झाला नाही, तर ती दीर्घकाळ चाललेली उत्क्रांती आहे. त्याची पाळेमुळे संतपरंपरेपर्यंत जातात.व्यक्तिकेंद्रित इतिहासाची मांडणी त्यांनी  तेव्हासुद्धा टाळली . त्यांच्या इतिहासाचे नायक केवळ शिवाजी महाराज नाहीत तर तो सबंध मराठी समाज आहे.

Bhosari : संत निरंकारी मिशनचा बाल संत समारोह उत्साहात संपन्न

त्याचे नेतृत्व महाराजांकडे आहे. त्यांनी नेहमी शास्त्रीय व राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवला. पण, ते संकुचिततेकडे वळले नाही. त्यांच्याकडे कोणताही अभिनिवेश नव्हता. हिरव्या, लाल वा भगव्या अशा कोणत्याही रंगाचा इतिहास असो. असे चष्मे लावणे स्वत:वरही अन्याय करण्यासारखे आहे. इतिहास वस्तुनिष्ठ   द्यायचा असेल, तर असे चष्मे लावून चालणार नाही. याची जाणीव त्यांनी करून दिली. इतिहासात परखड चिकित्सा, समतोल मांडणीची दृष्टीही त्यांनीच दिली.

रानडे हे प्रबोधन पुरुष होते. जांभेकर ते आंबेडकर अशी महाराष्ट्राला प्रबोधनाची दीर्घ परंपरा आहे. आंबेडकर यांनी तर रानडे यांना महापुरुष म्हटले आहे. राजकीय कैद्यापेक्षा समाजसुधारकाचा त्याग मोठा असतो. कारण समाजाला तो मान्य नसतो. समाजाचा बहिष्कार सोसून त्याला काम सुरू ठेवावे  लागते, याकडे लक्ष वेधत समाजाचे मंडळींकरण व्हावे, असे राजवाडे म्हणत असत. न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी यांनी हे कृतीतून दाखवून दिले. रानडे यांनी ग्रंथकार संमेलन, वसंत व्याख्यानमाला असे कितीतरी उपक्रम सुरू केले.

अनेक संस्था उभारल्या. ग्रंथालये उभी केली. राष्ट्रीय स्तरावरील इंडियन नॅशनल काँग्रेस, सोशल कॉन्फरन्स, इंडस्ट्रीयल कॉन्फरन्स अशा संस्था सुरू  करण्यातही त्यांचा पुढाकार राहिला. त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे. मराठी विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेसाठी तर ते चार दशके झगडत होते. आज आपण  अभिजात मराठीबद्दल बोलतो.
तसे गेले एक शतकभर मराठीचा लढा सुरूच आहे आणि त्याचे आद्य प्रवर्तक रानडे हेच आहेत, ते भारतीय अर्थशास्त्राचेही जनक होते, आधुनिक इतिहासाची पायाभरणीही त्यांनी केली. मराठी वाङ्मयाचा इतिहासही त्यांनी लिहिला. त्याचे गुणात्मक परीक्षणही केले. या पद्धतीची दृष्टी, अर्थशास्त्रीय विचार,  इतिहास लेखन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचार त्यांनी मांडला. त्यामुळे सर्वांगीण सुधारक, हे त्यांचे जे वर्णन केले जाते, ते समर्पकच आहे, असे डॉ. दीक्षित म्हणाले.

अध्यक्षपदावरून बोलताना प्रदीप रावत म्हणाले, पाठ्यपुस्तके आणि त्यात अभ्यासक्रम हा चिंतनाचा विषय आहे. त्यावर आम्ही कायम आवाज उठवत आहोत. यात मराठ्यांच्या इतिहासाला स्थान मिळत नाही. एनसीइआरटीत शिवरायांवर तीन ओळी, तर इतरत्र मराठ्यांचा इतिहास दीड पानात उरकला जात असेल तर त्याला काय म्हणायचे? मराठ्यांचा इतिहास म्हणजे तळटीप झाली, हे वाईट आहे.

ही स्थिती बदलली पाहिजे. मराठ्यांच्या इतिहासाला चांगले स्थान मिळाले पाहिजे. शिवराज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे. शिवरायांचे स्वराज्य, त्याचा संपूर्ण भारतावरील परिणाम व त्यांचे योगदान याबाबत संपूर्ण देशाला सांगितले गेले पाहिजे. इतिहासात कोलांटउड्या मारून चालत नाही. जे सत्य तो  इतिहास मांडला पाहिजे. कुणाला खूश करण्यासाठी म्हणून इतिहास नसावा. सत्य इतिहास समोर आणण्यातच लोकांचे भले आहे. इतिहासाशी आपण एकनिष्ठ रहायला हवे. खरा इतिहास लोकांना उद्बोधक ठरेल. आम्ही त्या दृष्टीने प्रकल्प हाती घेतला असून, त्याला सर्वांचे पाठबळ मिळावे, असे आवाहनही रावत यांनी केले.

बापूसाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अवंती बायस यांनी केले, तर विजयचंद्र थत्ते यांनी आभार (Pune) मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.