PMC Commissioner Transfer: महापालिका आयुक्तांच्या बदलीला राजकीय वास

Pune: Political smell for the transfer of Municipal Commissioner केवळ लॉकडाऊनला विरोध केला म्हणून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा बळी देणे बरोबर नसल्याची जनभावना व्यक्त होत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात चांगले काम करीत असलेल्या पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची तातडीने बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या रोज 4 हजार 500 च्या वर चाचण्या होत आहेत. त्यामुळे 1 हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. शहरात 26 हजार 904 रुग्ण झाले आहेत. 16 हजार 996 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 9 हजार 92 सक्रिय रुग्ण आहेत. या रोगामुळे 816 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. कोरोनाच्या सोबत आपल्याला जगावे लागणार, अशी वास्तववादी भूमिका शेखर गायकवाड यांनी मांडली.

हे संकट वाढायला नको म्हणून त्यांनी कंटेन्मेंट झोन तयार केले. शहरातील अर्थकारण चांगले राहावे, यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले. सोबतच जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यावर त्यांनी भर दिला. असे त्यांचे चांगले काम सुरू असताना त्यांची तडकाफडकी बदली कशी करण्यात आली, असा सवाल सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट निर्माण झाले. 6 महिनेही होतात ना होतात तोच त्यांना पुन्हा त्यांच्या साखर आयुक्तपदावर पाठविण्यात आले. आता नवीन आयुक्तांनाही परिस्थिती समजून घेण्यात बराच वेळ जाणार आहे. कोरोनाचे कारण देत एकट्या शेखर गायकवाड यांचीच बदली का करण्यात आली? इतर अधिकाऱ्यांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राज्य शासनातर्फे इतर 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे काय करणार, केवळ लॉकडाऊनला विरोध केला म्हणून अशा महत्वपूर्ण एकाच अधिकाऱ्यांचा बळी देणे बरोबर नसल्याची जनभावना व्यक्त होत आहे. मागील 5 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. यावेळी असे कडक लॉकडाऊन परवडणारे नाही.

जे नागरिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत नाही. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. मात्र, सरसकट सर्वच पुणेकरांना शिक्षा देणे बरोबर नाही. शहरातील व्यापाऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शेखर गायकवाड यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. आता मात्र त्यांची बदली करण्यात आल्याने नवीन आयुक्तांसमोर हे संकट सोडविणे आव्हानात्मक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.