Pune : आपत्ती काळात खेळले जाणारे राजकारण दुर्दैवी : डॉ. रामराजे नाईक – निंबाळकर

Politics played in times of disaster is unfortunate: Dr. Ramraje Naik - Nimbalkar

एमपीसी न्यूज – आपत्तीकाळात खेळले जाणारे राजकारण दुर्दैवी असून समाजाने त्याला प्रतिबंध करण्यासाठी दबाव गट निर्माण केला पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती डॉ. रामराजे नाईक – निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भूपर्यावरणाचे अभ्यासक प्रा. डॉ. सतीश ठिगळे यांनी चाळीस वर्षाच्या संशोधनावर लिहिलेल्या ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ या पुस्तकाचे प्रकाशन रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते नवी पेठ येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, ‘ठिगळे यांचे पुस्तक दिशादर्शक असून त्यांनी सूचविलेले दरड थोपविण्याचे उपाय शासनाने गंभीरतेने घ्यायला हवेत. कोणतीही समस्या उदभवल्यानंतर जी धावपळ होते ती थांबायला पाहिजे. पुनर्वसना सारख्या समस्येवर सर्वमान्य मार्ग काढायला हवा.

ठिगळे यांच्या अभियानास शुभेच्छा देताना ‘पर्यावरणीय समस्या वाढत जाणार आहेत. तरुण पिढीने त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, त्या कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. सतीश ठिगळे म्हणाले, भूपर्यावरण हा विषय समाजापर्यंत पोहोचविण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. 1983 पासूनचा हा प्रवास माझ्या शैक्षणिक जडणघडणीत महत्वाचा ठरला. दरड समस्या हाताळताना हा केवळ शास्त्रीय मीमांसेचा विषय नाही तर त्याला सामाजिक, मानसिक, आर्थिक कंगोरे आहेत.

या सर्वांचा एकत्रित विचार झाल्याशिवाय समस्येवर तोडगा सापडणार नाही. त्यासाठी आपद्ग्रस्तांशी संवाद साधण्याची कला अवगत करणे आवश्यक आहे याची जाणीव पुणे विद्यापीठातील पर्यावरण विभागात अध्यापन करताना प्रकर्षाने झाली.

त्यातून आंतरशास्त्रीय संशोधनाची दिशा मिळाली. ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हे पुस्तक त्याचीच परिणीती आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मी ऋणी आहे.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमास उपस्थित राहता येत नाही याबद्दल खेद वाटतो. ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हा एक आगळावेगळा प्रयोग असून अभ्यास, अनुभव आणि सामाजिक जाणीव अशा अधिष्ठानांवर आधारित आहे.

दरडी घसरण्यापूर्वी उद्भवणारी लक्षणे म्हणजे निसर्ग वाजवित असलेली धोक्याची घंटाच असते. त्याबद्दल सह्याद्रीच्या परिसरातील जनतेस भूमातेच्या भाषेची ओळख करून देण्यासाठी 1983 पासून डॉ. ठिगळे शाळा- महाविद्यालये , सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

आपत्तीकडे केवळ शास्त्रीय नव्हे तर सामाजिक, मानसिक, आर्थिक दृष्टिकोनातूनही पहाणं आवश्यक आहे याबद्दलची त्यांची अनुभूती दिशादर्शक आहे दरड समस्येवर काय करावे आणि काय करू नये यासंबंधीचे चिंतन पुस्तकाची प्रस्तुतता अधोरेखित करते.

संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि तत्कालीन स्वार्थाच्या पलीकडे पाहण्याची वृत्ती यातून उमटलेले ठिगळे सरांचे हे लिखाण आणि त्यासाठी अभियान राबविण्याचा संकल्प हा समस्त प्राध्यापकांसाठी आदर्शवत ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like