Pune : खास दिवाळीसाठी प्रदूषण विरहित सोलार मॅजिक दिवे तयार;काईट टेक संस्थेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – प्रदूषण विरहीत दिवाळीसाठी उपयुक्त, भारतीय बनावटीचे, तेलाची बचत करणारे, कुंभारांना रोजगार देणारे, सौर ऊर्जेवर चालणारे पर्यावरणपुरक ‘सोलार मॅजिक दिवे’ खास दिवाळीनिमित्त काईट टेक संस्थेने तयार केले आहेत. चीनी बनावटीच्या दिव्यांवर बहिष्कार घालण्यासाठी आणि मेक इन इंडियाला पाठबळ देण्यासाठी हे दिवे तयार केले असल्याची माहिती काईट टेकच्या संस्थापिका रश्मी बोथरा यांनी सांगितले.

यावेळी ” कुंभार व्यवसाय डबघाईला येत चालला आहे. या माध्यमातून राज्यभरातील कुंभारांना प्रशिक्षण देणार ” असल्याचे रश्मी बोथरा यांनी सांगितले. रश्मी बोथरा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की दिवाळी हा सण लख्ख प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा सण. प्रत्येक घर दीपावलीला दिव्यांनी सजते. सूर्याच्या उर्जेचा वापर करून शहापूरच्या आरमाईट इंजिनिअरींग कॉलेजच्या प्राध्यापिका असलेल्या रश्मी बोथरा यांनी सौर उर्जेवर चालणारे भारतातील पहिले सोलार मॅजिक दिवे बनविले आहेत. काईट टेक या संस्थेमार्फत हे सोलार मॅजिक दिवे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ऑन-ऑफ प्रकारचा दिवा, फुंकर मारल्यावर, टाळी वाजवल्यावर, हात लावल्यावर बंद चालू होणारा सोलार मॅजिक दिवा, मॅग्नेटिक स्टॅण्डवर ठेवल्यास पेटणारा दिवा, सजविलेला बाऊलचा मॅग्नेटीक स्टॅण्डवरचा दिवा असे विविध प्रकारचे दिवे बनविले आहेत. मातीच्या दिव्यावर सोलार पॅनल वापरले असून, या दिव्यात वापरली गेलेली बॅटरी दिवसभर उन्हात ठेवल्यावर चार्ज होते आणि रात्री हा दिवा वापरु शकतो.

विशेष म्हणजे हे दिवे पर्यावरण असून, किमान 5 वर्षे टिकतील, असा दावा करण्यात आला आहे. समाजातील अशिक्षित, दुर्बल वर्गासाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने या सोलार मॅजिक दिव्यांचे उत्पादन करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी हे दिवे बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या असून, सुमारे चार हजाराहून अधिक शालेय विद्यार्थी आणि अडीच हजार पालकांना सोलार दिवे बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे रश्मी बोथरा यांनी सांगितले.

सौर उर्जा हा न संपणारा उर्जेचा स्त्रोत आहे. याचा वापर केल्याने प्रदूषणाला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. येणाऱ्या काळात सौर उर्जेवर चालणारी टॉर्च, सायकल यासह सुमारे 100 वस्तूंची निर्मिती करण्यात येणार आहे. सोलार मॅजिक दिव्यासंबंधी प्रशिक्षण आणि माहितीसाठी 8779189752 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रश्मी बोथरा यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.