Pune : कोरोना काळात मराठी चित्रपटसृष्टीला सकारात्मक दिलासा ; ‘प्लॅनेट मराठी’ची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा

एमपीसी न्यूज – ‘एबी आणि सीडी’च्या भरघोस यशानंतर प्लॅनेट मराठी सहा नव्या कोऱ्या सिनेमा आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहे. प्लॅनेट मराठीचा सर्वेसर्वा आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर याने नुकतीच ही घोषणा केली आहे.
प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल.
या नंतर निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ‘अॅमेझाॅन प्राइम’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा सिनेमा उचलून धरला.
‘एबी आणि सीडी’च्या भरघोस यशानंतर प्लॅनेट मराठी सहा नव्या कोऱ्या सिनेमा आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहे. प्लॅनेट मराठीचा सर्वेसर्वा आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर याने नुकतीच ही घोषणा केली आहे. शांतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे आगामी काळातील त्यांचे दोन महत्त्वाचे चित्रपट आहेत.
या बाबत बोलताना बर्दापूरकर म्हणाले, सिनेमाच्या यश अपयशाबरोबरीने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही संकटापुढे खचून न जाता त्याचा धैर्याने सामना करत येणाऱ्या भविष्याला सामोरं जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवायला हवी. आपण जर ‘फिल्म इंडस्ट्री’ म्हणतो, तर त्यातून सतत निर्मिती होणं अत्यावशक असल्याचंही ते आवर्जून सांगतात.
शिवाय, सिनेमाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सगळ्यांना येत्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करायला लागू नये म्हणून हा निर्णय त्या प्रत्येकासाठी मोलाचा ठरणारा आहे.
बर्दापूरकर पुढे म्हणाले, प्लॅनेट मराठी नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकार कोणत्याही बाबतीत मागे पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असतो. आता प्लॅनेट मराठीच्या या भविष्यातील विविध प्रोजेक्ट्समध्ये प्लॅनेट टॅलेंट मधील कलाकारांसोबतच नव्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन कलाकारांना संधी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘मराठी सिनेश्रुष्टीमध्ये सुसूत्रता आणून कोणत्याही बाबतीत आपण कोलमडून न जाता त्यावर मात करण्याची गरज आहे. म्हणूनच, येत्या काळात प्लॅनेट मराठी सहा नवे कोरे सिनेमे आणि वेब सिरीज घेऊन येणारं आहे.
शिवाय, अनेक आर्थिक गणितं स्थिर राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केले आहे.