Pune : ‘तन्मात्र’ या नृत्याविष्कारातून उलगडला ‘प्रकृती’ चा अद्भुत मिलाफ

'तन्मात्र' कलाविष्कारात रसिक तल्लीन, पं.भवाळकर यांच्या गायकीलाही दाद

एमपीसी न्यूज- स्वस्फुरणाने नादब्रह्म जन्माला आला. मुलतत्वाचा हुंकार म्हणजे ओंकार. या मुलतत्वाला गती प्राप्त होऊन पंचमहाभुतांची निर्मिती झाली. या पाच तत्वांच्या मिलाफातून निर्माण झालेल्या प्रकृतीचे अफाट व अनाकलनीय गूढ ‘तन्मात्र’ या नृत्याविष्कारातून अनुभवताना रसिक तल्लीन झाले.

प्रकृति कथक नृत्यालयातर्फे संवेदन मैफल पार पडली. यानिमित्ताने गुरु रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी पुनर्निर्मिती केलेली ‘तन्मात्र’ रचना तब्बल 25 वर्षांनंतर कलामंचावर सादर झाली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रंगलेल्या मैफिलीत पं. उदय भवाळकर यांचे सुश्राव्य गायनही झाले.

‘तन्मात्र’ ही रोहिणीताईंची संरचना सृजनशक्तीचा एक आदर्श नमुनाच मानली जाते. त्यावेळेच्या काही मोजक्या प्रयोगांच्या दरम्यान, पाहायला मिळालेली ही कलाकृती पाहण्याची दुर्मिळ संधी यानिमित्ताने रसिकांना लाभली. ब्रह्मांडात प्रकृती पासून उत्पत्तीत झालेल्या सर्व वस्तुंमध्ये पंचतत्वाचे अस्तित्व आहे. यातील एकेक तत्व नृत्यातून उलगडून सांगताना या गर्भित चैतन्याची अनुभूतीच जणू रसिकांना आली. नृत्यभारतीच्या २० कलाकारांनी सादर केलेल्या ‘तन्मात्र’ रचनेतून कथकच्या असीमतेचे दर्शन घडले. उत्कृष्ट दर्जाचे संगीत संयोजन व लक्षवेधी प्रकाश योजनेमुळे या रचनेला एका वेगळ्या उंचीवर नेले.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित उदय भवाळकर यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या धृपद शैलीत ‘ शंकरा ‘ या रागाचे सौंदर्य उलगडले. संथ आलापातून प्रारंभ करत आवाजाच्या घुमारावर भर देत, जोरकस, लयबद्ध गायकीतून त्यांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी पाटणकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.