Pune : लॉकडाऊन काळात रमझानचे नमाज पठण घरातच करावे : डॉ. पी. ए. इनामदार 

एमपीसी न्यूज  : कोरोना विषाणू साथीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या  पवित्र रमझान महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक  तत्वांचे मुस्लिम बांधवानी काटेकोरपणे पालन करावे. घरात राहूनच नमाज अदा करणे आणि इतर धार्मिक विधी करण्याचे आवाहन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे (आझम कॅम्पस)अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी मुस्लिम बांधवाना  केले आहे.

 

डॉ. इनामदार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे   हे आवाहन केले.  कोरोना साथीचे आव्हान लक्षात घेत देशभरातील देवळे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक ठिकाणांची सर्व धार्मिक कार्ये रद्द करण्यात आली आहेत. देशभरात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.रमजानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन आणि सामजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या धार्मिक आणि सामाजिक संस्था तसेच व्यक्तींना स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असे डॉ. इनामदार यांनी म्हटले आहे.

 

प्रशासन,धार्मिक-सामाजिक संस्थाच्या स्वयंप्रेरित, प्रभावी आणि सकारात्मक प्रयत्नांमुळेच देशभरातील मुस्लिम बांधवानी 8 आणि 9 एप्रिल रोजी घरात राहूनच नमाज आणि इतर धार्मिक विधी पार पाडत ‘शब-ए-बारात’ पाळली. कोरोना साथीमुळे उद्भवलेली आव्हाने लक्षात घेत, भारतीय मुसलमानांनी शब-ए-बारातच्या प्रसंगी लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली हे कौतुकास्पद आहे,असेही  डॉ. इनामदार यांनी या  पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.