Pune : नगरसेविकेच्या समयसुचकतेमुळे गर्भवती महिलेचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज – येरवड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यावेळी आरोग्य विभागाशी आणि इतर यंत्रणेशी संपर्क केला असता, रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता चव्हाण आणि त्यांच्या पतीने समयसूचकता दाखवीत आपल्या खाजगी वाहनातून गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या महिलेची प्रसूती सुखरूप झाली.

नगरसेविका श्वेता चव्हाण आणि त्यांच्या पतीच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. महापालिका प्रशासन, पोलीस, डॉकटर रात्रंदिवस हे संकट कमी करण्यासाठी काम करीत आहे. तर, दुसरीकडे महापालिकेचे नगरसेवकही आपापल्या परीने नागरिकांना मदत करीत आहे.

सध्या कोरोनाचा संकटामुळे नगरसेवकांनाही रात्री उशिरापर्यंत आपल्या जनतेची सेवा करावी लागत आहे. गोरगरीब नागरिक उपाशी राहू नये, यासाठी अन्नदान, धान्य वाटप, जेवणाची सोय केलेली आहे. मागील 3 महिन्यांपासून हा उपक्रम आपापल्या प्रभागांत सुरू आहे. विशेषतः झोपडपट्ट्या भागात तर खूपच काळजी घ्यावी लागत आहे.

येरवड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नगरसेविका श्वेता चव्हाण आणि त्यांचे पती अनिल चव्हाण यांनी या महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. अर्ध्या तासात गर्भवती महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

दरम्यान, येरवडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये 2 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पण, या रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येरवडा भागात कोरोना असेपर्यंत नागरिकांसाठी आपले वाहन उपलब्ध असेल. त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल चव्हाण यांनी केले आहे.

तर, नगरसेविका आणि त्यांच्या पतीने वेळीच या गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.