Pune : ‘मेरी सायकल’ लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न

एमपीसी न्यूज – आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी गरज आहे. नेमका हाच संदेश ‘मेरी सायकल’ हा लघुपट देऊन जातो. या लघुपटाचा प्रीमियर शो पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कोऑपरेटिव मैनेजमेंटच्या प्रेक्षागृहात शनिवारी (दि. 13) आयोजित करण्यात आला होता.

निनाद हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील छोटा मुलगा. त्याच्या वाढदिवशी त्याची मोठी बहीण त्याला एक नवीकोरी सायकल भेट देते. त्याच दिवशी निनाद आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी सायकल घेऊन मैदानावर जातो. खेळून झाल्यावर पाहतो तर त्याची सायकल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात येते. सायकल हरवल्याचे समजताच वडील निनादला रागावतात. अखेर पोलिसात तक्रार दिली जाते. त्यानंतर काय होते हे पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरेल. निनादची सायकल त्याला सापडते का ? सायकल कोणी चोरलेली असते ? का चोरलेली असते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यातूनच हा लघुपट मुलांवर चांगला संस्कार बिंबवून जातो.

या लघुपटात निनादची भूमिका केली आहे, स्वराज कांबळे या छोट्या मुलाने. पडद्यावर प्रथमच काम करताना स्वराजमध्ये नवखेपणा जाणवत नाही. अतिशय समरसून त्याने निनादची भूमिका केली आहे. त्याला पार्थ पटकराव या छोट्या मुलाने चांगली साथ दिली आहे.

अन्य कलाकारांमध्ये अगस्त आनंद (वडील), रिचा सिंग (आई), आर्विका गुप्ता (बहीण), डॉ आदित्य पटकराव (पोलीस इन्स्पेक्टर) पार्थ पटकराव (पार्थ) आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप राज यांनी (पार्थचे आजोबा) यांनी भूमिका केल्या आहेत.

अगस्त आनंद यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी लहान मुलांकडून छान भूमिका करून घेतली आहे. लघुपटाची निर्मिती आदित्य पटकराव आणि प्रियंका आनंद यांनी केली आहे.

एकूणच लुप्त होत चाललेल्या मानवी मूल्यांना पुनरुज्जीवित करण्याचे काम हा लघुपट करून जातो. दुसऱ्याला आपल्या सुखामध्ये सामावून घेणे आणि घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हा संदेश हा लघुपट देऊन जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.