Pune : अभियांत्रिकी क्षेत्राने कुशल मनुष्यबळ तयार करावे

'एम्पॉवरिंग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स ' विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेत मान्यवरांचा सूर

एमपीसी न्यूज – भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘एम्पॉवरिंग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स’ विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेला विविध उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियांत्रिकी क्षेत्राने कुशल मनुष्यबळ तयार करावे, त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्राचे संबंध अदृढ होतील, असा सूर कार्यशाळेत उमटला.

‘निटॉर इन्फोटेक’च्या सहाय्यक उपाध्यक्ष रोहिणी वाघ यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. भारती विद्यापीठाच्या धनकवडी कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा पार पडली. फोकस इंटिग्रेटेड टॅलेंटचे जितेंद्र संधू, सिम्पलीसिटी कम्यूनिकेशन्सचे अजिताभ दत्त, डिझाईन थिंकिंग कन्सल्टन्ट प्रभुलिंग झुंझा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  • भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला राज्यातील ५५ महाविद्यालये ट्रेनिंग, प्लेसमेंट ऑफिसर्स आणि उद्योग क्षेत्रातून मनुष्य बळ विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशिक्षणाचा भाग व्यवस्थित हाताळला तर प्लेसमेंट आपोआप होत राहते’, असे रोहिणी वाघ यांनी उदघाटन सत्रात बोलताना सांगितले. उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र हे सुरुवातीपासून एकमेकांशी संबंधित आहेत. हे संबंध अधिक दृढ होण्याची गरज आहे. त्यामुळे पदवीधर उमेदवारांची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल.

  • ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सनी कार्पोरेट जगतातील वेगवान बदल आत्मसात करावेत आणि शाश्वत रोजगार उपलब्धतेकडे लक्ष केंद्रित करावे. समस्या सोडवणारे प्रशिक्षित आणि कुशल मन्युष्यबळ कार्पोरेट क्षेत्राला उपलब्ध करून देणे, हे देशाच्या प्रगतिलाही उपयुक्त ठरणारे आहे.

जितेंद्र संधू म्हणाले, ‘तीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालयातून निर्माण होणाऱ्या पदवीधरांपैकी ५१ टक्के पदवीधर काम मिळविण्यास पात्र ठरतात. त्यामुळे रोजगारक्षम गुणवत्ता निर्माण करणे हे आव्हान आहे. इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना कामाचा नेमका आवाका येऊ शकतो.’

  • अजिताभ दत्त म्हणाले, ‘ट्रेनिंग आणि प्लेसमेंटमध्ये डिजिटल मार्केटिंगची मदत होऊ शकते. उद्योग, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि ग्राहक या सर्वांना चांगल्या प्रकारे संदेश पोहोचवायचा असतो. त्यासाठी आपले डिजिटल धोरण तयार असले पाहिजे.

प्राचार्य डॉ. आनंद भालेराव म्हणाले, ‘अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्राने एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यातील अडचणींचे निवारण करणारे हुशार आणि तज्ञ अभियंते घडवणे हे आव्हान आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रगतीला पूरक वातावरण तयार केले पाहिजे.’ प्रा. नचिकेत कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.