Pune : अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात पारंपरिक नृत्य रचनांचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस तर्फे ‘अनुभूती’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन एरंडवणे येथील महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात करण्यात आले होते. विविध पारंपरिक नृत्याचे सादरीकरण आणि नृत्य सादरीकरणाला मिळालेल्या गायन, वादनाच्या साथीने रसिकांनी शास्त्रीय नृत्याचा सशक्त कलाविष्कार अनुभविला.

यावेळी पंडित विकास कशाळकर, मनिषा साठे, राजन कुलकर्णी, धनंजय दैठणकर,स्वाती दैठणकर, अंजली मालकर, वैशाली पारसनीस, उमेश मोघे, अपर्णा गुरव, मिलिंद पोटे, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे संचालक प्राध्यापक शारंगधर साठे उपस्थित होते.

कार्यक्रमात सुरुवातीला मेधा हुबळी, संकेत सप्रे यांनी गायन केले. अमेय बिच्चू यांनी हार्मोनिअम वादन केले तर ऋषिकेश जगताप यांनी तबला तसेच निनाद दैठणकर यांनी संतूर वादन करत रसिकांची मने जिंकली. शुभम खंडाळकर यांनी बोलावा विठ्ठल हा अभंग सादर केला.

मौशमी जाजू हिने प्रथम सुमन श्री गणेश या गणेशवंदनेने कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थीनींनी लाईव्ह तराणा सादर केला. नऊ मात्रांचा ताल, अनेक चक्रांचा समावेश असलेले चरण सादर करण्यात आले. या तालप्रस्तुतीनंतर ‘आज मोरी कलाई मुरग गई’ही ठुमरी सादर करण्यात आली.

यानंतर पंचकन्येवर आधारित नृत्य विद्यार्थीनींनी सादर केले. उत्तम अभिनयाने नटलेल्या सुंदर आणि सशक्त कलाविष्काराने रसिकांची मने जिंकली. पौराणिक कथांवरील नृत्याचे यानंतर सादरीकरण झाले. कृष्णाच्या बाललीला सांगते खोटे त्या गौळणी या ग.दी. माडगूळकर यांच्या रचनेच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अभंगाचे सादरीकरण झाले. देविका बोरठाकूर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.