Pune : खाजगी रुग्णालयांनी कोविड 19 रुग्णांकडून शासन नियमानुसार दर आकारणी करावी – विभागीय आयुक्त

Private hospitals should charge rates from Kovid 19 patients as per government rules - Divisional Commissioner

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून खाजगी रुग्णालयांचा आढावा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना करुन खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (सोमवारी) कॉन्सिल हॉलमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, भारती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अस्मिता जगताप यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.

खासगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशात निश्चित करून दिल्यानुसार दर आकारणी करावी. खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी, तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी, असे सांगून रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात व जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्णालयाने शासनाकडे अद्ययावत व वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करावी, जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल.

प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण सर्व मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व अन्य वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती दिली.

बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण, उपचार करण्यात आलेले रुग्ण, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा, रुग्णवाहिका व्यवस्था, अधिक रुग्ण असलेली क्षेत्रे, रुग्णांचे समुपदेशन, मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना, डॉक्टरांना आवश्यक सोयी-सुविधा, पीपीई किट, सॅनिटायझर आदी वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता, उपलब्ध आणि आवश्यक डॉक्टर व परीचारकांची संख्या अशा विविध बाबींचा डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘कोविड-19 विरुद्धच्या युद्धात डॉक्टर, परिचारिकांची भूमिका महत्वपूर्ण असून मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत. खाजगी रुग्णालयांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून एकत्रित काम करून पुणे जिल्हा कोरोनामुक्त करुया, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही बदल करणे आवश्यक असल्याचे कळविल्यास प्रशासन निश्चितच सकारात्मक असेल.

रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळावे, जेणेकरून अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होईल, असेही जिल्हाधिकारी राम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.