Pune : एचसीएमटीआर, नदीसुधार, रिंगरोड, बीडीपी, शिवसृष्टी प्रकल्प रेंगाळणार का ?

एमपीसी न्यूज – राज्यात सरकार स्थापन होत नसल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुणे शहरातील अनेक प्रकल्पांना बसण्याची चिन्हे आहेत. एचसीएमटीआर, नदीसुधार, रिंगरोड, बीडीपी, शिवसृष्टी, महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा, मेट्रो, असे अनेक प्रकल्प रखडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील 18 दिवसांपासून राज्यातील सरकार काही स्थापन होत नसल्याचे दिसून येत आहे. बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या जाहीरनाम्यात शिवसृष्टी उभारणार असल्याचे म्हटले आहे. पाटील हे कोथरूड मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

एचसीएमटीआर प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. सुमारे 45 टक्के दराने या प्रकल्पाच्या निविदा आल्या आहेत. त्याचा खर्च आणि जागेच्या संपादनासाठी येणाराही खर्च राज्य शासन देणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. पुणे महापालिकेनेच त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास सांगितले आहे. महापालिकेचे बजेट हे 6 हजार कोटींच्या आसपास आहे. या प्रकल्पाचा खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक डोलाराच कोसळणार आहे. शिवाय या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यासही स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी हरकत घेतली. एवढा मोठा प्रकल्प असताना सल्लागाराला 200 कोटी देण्यास काहीही हरकत नसल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.

नदीसुधार योजनेसाठी 900 कोटी रुपये निधी केंद्राकडून दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते. पीएमआरडीएची स्थापना, मेट्रो प्रकल्पाला भाजपने गती दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना – भाजपची युती संपुष्टात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अस्थिर राजकारणाचा पुणेकरांनाही फटका बसण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.