Pune : पुण्यातील आणखी 22 ठिकाणे ‘सील’ करण्याचा प्रस्ताव; करोनाबाधितांची संख्या वाढतेय

एमपीसी न्यूज – पुण्यातील आणखी 22 ठिकाण सील करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. आज आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्याची संख्या आता 33 वर गेली आहे. यापूर्वी गुलटेकडी पासून कोंढवापर्यंतचा भाग पुणे महापालिकेतर्फे सील करण्यात आला होता.

या भागात पोलिसांनी संचारबंदीही लागू केली आहे. आणखी 22 ठिकाणं सील करण्यात येणार असल्याने पुणेकरांवरील कोरोनाचे संकट गडदच होत चालले आहे. नवीन 22 ठिकाणे कोणती असणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे 69 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 33 कोरोनाबाधित रुग्ण तर ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हा सर्व भाग ‘सील’ करण्यात आला असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

त्या खालोखाल हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 21 कोरोनाबाधित रुग्ण, धनकवडी- शंकरनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 19 कोरोनाबाधित रुग्ण, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 16 कोरोनाबाधित रुग्ण, शिवाजीनगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 11 कोरोनोबाधित रुग्ण, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 10 कोरोनाबाधित रुग्ण तसेच वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आठ कोरोनाबाधित रुग्ण, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाच कोरोनाबाधित रुग्ण, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तीन कोरोनाबाधित रुग्ण, नगर रोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तीन कोरोनाबाधित रुग्ण, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या व्यतिरिक्त महापालिका हद्दीबाहेरील 12 कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.