Pune : ‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या -महापौर

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’विरोधात सर्वत्र लढा चालू आहे. या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांनना पंतप्रधान, मुख्यमंत्री, शासनाचे विविध विभाग आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता सुरक्षा कवच उपलब्ध करून देत आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीनेही सामाजिक सुरक्षा अंतर्गत “सुरक्षा कवच”, उपलब्ध करून द्यावे, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता प्रभावी उपाययोजना राबविताना मनपातील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणावर जीव धोक्यात घालून कामे करीत आहेत.

रुग्णभेटी, रुग्ण तपासणी, रुग्णांशी संवाद, मार्गदर्शन, जनजागृती, औषधं उपचार, सर्वेक्षण, विलगिकरणाच्या ठिकाणी रुग्ण वाहतूक मार्गदर्शन, दैनंदिन औषध उपचार, रुग्णांशी संबंधित सर्व कामे करताना अहोरात्र कार्यरत आहेत.

अशा परिस्थितीत वरीलप्रमाणे सर्वाना सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कार्यरत असताना जीवितहानी होऊ नये, कौटुंबिक हानी होऊ नये, याकरिता वरील सर्व घटकांकरिता “सुरक्षा कवच”, योजना मनपा प्रशासनाने द्यावी, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य व मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसास पुणे मनपाच्या सेवेत संधी उपलब्ध करुन द्यावी.

या योजनेकरिता मनपातील पक्षनेते, विविध समित्या व मुख्य सभेची मान्यता घेतली जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.