Pune : ‘पोलीस आयुक्तांनी दुचाकीवरून हेल्मेट घालून शहरात फिरावे, मगच हेल्मेट सक्ती करावी’

एमपीसी न्यूज : पोलीस आयुक्तांनी एकदा मोटारीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून शहरात फिरावे, मग हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, असा तिरकस सल्ला देत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने शहरात हेल्मेट सक्ती राबविण्यास विरोध केला. आधी शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, मगच शहरात हेल्मेट सक्ती राबवा, असा टोलाही कृती समितीने लगावला आहे.

पुणे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांनी 1 जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेट सक्ती लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीची आज (मंगळवारी) बैठक झाली. या बैठकीत हेल्मेट सक्ती हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकरांच्या भावना निवेदनाद्वारे आयुक्तांना देण्यात येतील. त्यानंतरही सक्ती मागे न घेतल्यास निदर्शने, रास्ता रोको आणि सविनय कायदेभंगाचा पवित्राही समितीच्या सदस्यांनी घेतला आहे . समितीचे नेतृत्व ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांच्याकडे देण्यात आले आहे.

या प्रसंगी अंकुश काकडे, विवेक वेलणकर, शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, संदीप खर्डेकर, श्याम देशपांडे, रुपाली पाटील, संजय बालगुडे, बाळासाहेब रूणवाल, प्रदीप देशमुख, मनाली भिलारे, मंदार जोशी, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.