Pune : भाजप कार्यालयावर जैन महिलांचा शनिवारी मूक मोर्चा

झारखंडमधील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या तीर्थस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास विरोध

एमपीसी न्यूज – झारखंडमधील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणासाठी जैन समाजातील महिला भाजपच्या पुणे शहर कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहेत. देशात पहिल्यांदाच जैन महिला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरणार आहेत. येत्या शनिवारी (13 ऑक्टोबर) हा मूक मोर्चा निघणार असल्याची माहिती मूकमोर्चाच्या संयोजिका शर्मिला ओसवाल यांनी दिली.

झारखंड सरकारने समेध शिखरजी येथे पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने त्याठिकाणी मांस, मटन दारु, रेस्टॉरंट सुरु होत आहेत. समेध शिखरजी येथे जैन धर्माच्या 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण झाले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या निर्णयामुळे या पवित्र स्थानाचे पावित्र्य धोक्यात आल्याने जैन समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

झारखंड सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून शनिवारी सकाळी 10 वाजता जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानापासून या मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. जैन समाजातील महिला एकत्र येणार आहेत. भाजप शहराच्या कार्यालयावर मूक मोर्चा जाईल व भाजपचे शहराध्यक्ष व पदाधिकारी यांना समेध शिखरजी संदर्भातील निवेदन दिले जाईल.

जैन समाजाच्या समेध शिखरजी संदर्भातील भावना अतिशय तीव्र आहेत. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांपर्यंत त्या या मूकमोर्चाच्या माध्यमातून व निवेदनाद्वारे पोहोचविल्या जातील. झारखंड राज्यातील भाजपचे सरकार व पदाधिकाऱ्यांपर्यंत पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आमच्या भावना पोहचवतील ही अपेक्षा आहे. जैन समाजातील सर्व ज्येष्ठ महिला यात सहभागी होणार आहेत, असेही शर्मिला ओसवाल यांनी सांगितले आहे. या मूक मोर्चाचे संयोजन शर्मिला ओसवाल, रिटा गांधी, सुलभा भंडारी, कविता शहा, स्वाती मेहता करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.