Pune : गरीब नागरिकांना आवश्यक औषधे मोफत द्या : राष्ट्रवादीची आयुक्तांकडे मागणी

Pune: Provide free essential medicines to poor citizens: NCP demands commissioner

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने गोरगरीब नागरिकांचे उत्पन्न बंद आहे. त्यांच्या जवळचे पैसेही आता संपले आहे. त्यामुळे या नागरिकांना दैनंदिन घ्यावी लागणारी औषधे मोफत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, अनेक नागरिकांना मधुमेह, रक्तदाब व इतर विविध आजार आहेत. कित्येक गरिब नागरिकांनी रोजची औषधे घेणे बंद केल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

अशा परिस्थितीत मनपाने पुढे येऊन अशा नागरिकांना दैनंदिन लागणारी औषधे मोफत पुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी पुणे मनपाच्या “शहरी गरीब” योजनेअंतर्गत या गोरगरीब नागरिकांना मदत करण्यात यावी.

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले वा इतर काही दाखले काढू शकत नाहीत. सध्याची संकटाची वेळ व नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, रेशनकार्डवरील त्यांचे उत्पन्न ग्राह्य धरून अशा नागरिकांना तातडीने “शहरी गरीब” योजनेचे कार्ड देण्यात यावेत.

नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे पुणे मनपाच्या दवाखान्यांमार्फत वितरित करण्यात यावीत. कोरोनाच्या संकटकाळी पुणे मनपाने मनपा हद्दीतील गोरगरीब पुणेकरांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसबा, कोथरूड, शिवजीनगर, कॅन्टोन्मेंट, हडपसर मतदारसंघातर्फे हे निवेदन देण्यात आले. त्यावर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप देशमुख, निलेश निकम, विनायक हनमघर, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, प्रशांत जगताप, भोलसिंग अरोरा, नितीन कदम, डॉ. सिद्धार्थ जाधव, राजेश साने, गणेश नलावडे, संतोष जोशी, सुहास उभे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.