Pune : ‘त्या’ नुकसानग्रस्त झोपडीधारकांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत तातडीने द्या -दीपाली धुमाळ

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर मतदारसंघातील वडारवाडी, पांडवनगर येथील झोपडपट्ट्यांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नागरिकांना प्रत्येकी तातडीने 25 हजार रुपये मदत पुणे महापालिकेने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली. यासंबंधीचे निवेदन आयुक्त शेखर गायकवाड यांना नुकतेच देण्यात आले आहे.

या भागातील झोपदट्ट्यांना आग लागल्याने जीवनावश्यक वस्तू, अन्न, धान्य, कपडे, भांडीकुंडी, शालेयपयोगी साहित्य, तसेच संसारपयोगी इतर वस्तू संपूर्णपणे जाळून खाक झालेल्या आहेत. या नागरिकांना घरे बांधणीसाठी तातडीने लाकूड, वासे, पत्रे आशा सोयीसुविधा उपलब्धता होण्यासाठी ही आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी.

सुमारे 40 झोपडपट्ट्यांचे आगीत नुकसान झाले आहे. त्यामध्ये नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू नष्ट झाल्या आहेत. या नागरिकांना आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. त्याबाबत नागरिकांनी महापालिकेसंदर्भात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. आग लागल्याने त्या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टी येथे लागलेल्या आगीत ज्या प्रकारे नागरिकांना मदत करण्यात आली होती, तशीच मदत या नागरिकांना करण्यात यावी, अशीही मागणी दीपाली धुमाळ यांनी पत्रात केली आहे.

आज सकाळी या भागात भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची धुमाळ यांनी पाहणी केली. यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते दयानंद इरकल, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.