BNR-HDR-TOP-Mobile

Pune : माझ्या आयुष्यात बंगाल माझी माता तर महाराष्ट्र माझा पिता – पं. बिरजू महाराज

एमपीसी न्यूज – “व्यक्तींच्या गुणांची पुजा होत असते, व्यक्तींची नाही. त्या गुणांचा अभ्यास आणि त्याविषयी प्रेम, आत्मियता आणि विश्वास नसला नसता तर मी केवळ बिरजू राहिलो असतो, महाराज झालो नसतो. जीवनात मला सर्व वडीलधा-यांचा नेहमीच आशीर्वाद मिळत राहिला आहे. माझ्या आयुष्यात बंगाल माझी माता तर महाराष्ट्र माझा पिता आहे, असे मत पं. बिरजू महाराज यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केले. 

पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांना अर्पण करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी पं. बिरजू महाराज यांना पुरस्कार अर्पण केला. यावेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. मनीषाताई साठे, पं. शाश्वती सेन, आदित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपर्णा अभ्यंकर उपस्थित होत्या.

सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, सव्वा लाख रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण सोहळ्यादरम्यान कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांनी भावमुद्रा प्रकट केल्या. आदित्य प्रतिष्ठान यंदा 36 वा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने संस्कृतीची अष्टांगे ज्या व्यक्ती आपल्या प्रचंड कार्याने समृद्ध करतात, त्यांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे “लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार” देउन सन्मानित करण्यात येते.

पुरस्काराला उत्तर देताना पंडीत बिरजू महाराज म्हणाले, “महाराष्ट्रात संगीतावर आणि कलेवर प्रेम करणारे रसिक भरपूर आहेत. पुणेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. आपल्यासारखे कलाप्रेमी रसिक सदैव कलेच्या पाठीशी राहूद्या, आपल्यासारख्या रसिकांमुळेच परंपरेची जपणूक होत आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत घुंगरांना आणि घुंगरू नादाला कधीही विसरणार नाही”

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, “मला आयुष्यात अनेक कलावंतांचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. अशा शास्त्रीय नृत्य कलाकारांचा सत्कार करायला मिळणे म्हणजे भाग्य आहे”

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, “बिरजू महाराज जेंव्हा रंगमंचावर येतात, तेंव्हा ते श्रीकृष्णाशी एकरूप होतात. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे नृत्य संगीत आणि नाट्याचा त्रिवेणी संगम आहे.”, भारतीय परंपरेत नृत्याला मोठे स्थान आहे. रस, भाव आणि व्यंजकांमुळे नृत्य साध्य होते. कथकमधून सर्व रस प्रकट होतात. प्रत्येक कला ही आकाशाएवढी महान असून तिला सीमा नाही”

पुरस्कार समारंभानंतर ‘कथक नृत्यसंध्या’ हा विशेष कार्यक्रम पं. मनीषाताई साठे व त्यांच्या शिष्या आणि शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथकच्या विद्यार्थिनींनी सादर केला. बिरजू महाराज यांनी स्वतः भावमुद्रा सादर करून आपल्या हृदयापासून दैनंदिन आयुष्यामधील कार्यातील ताल कसा असतो, याची प्रचिती दिली. तसेच श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित भावमुद्रांच्या प्रस्तुतीमुळे उपस्थितांना अद्वैताचा अनुभव मिळाला.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते योगाचार्य बाबासाहेब कोल्हटकर लिखित ‘पातंजल योगदर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन तर पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते पं. संजीव अभ्यंकर यांनी रामनवमीला रामाविषयीच्या अभंगाचे गायन केलेल्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले.

आदित्य प्रतिष्ठानचे कार्य वर्धिष्णु व्हावे यासाठी असंख्य कार्यकर्ते अखण्डपणे कार्यरत असतात. दोन वर्षातून एकदा अशा कार्यकर्त्यांपैकी एकाला ‘श्रध्दाश्री’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळी श्रध्दाश्री पुरस्कार दादर केंद्राचे कार्यकर्ते श्रीरामभाऊ मत्ते यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विशाखा व निरंजन बिळगी दांपत्य, कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे समीर देवधर, सनदी लेखापाल किशोर करंदिकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतीय संतांचे विचार आणि अध्यात्म समाजापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचवण्याचं महत्त्वाचं आणि सात्विक कार्य “आदित्य प्रतिष्ठान” ही पुण्यातील नामांकित संस्था गेली ३५ वर्षे करीत आहे. ‘आदित्य प्रतिष्ठान’तर्फे लोणावळ्याजवळ तेहतीस एकर जागेत जगातील पहिले संत विद्यापीठ साकारले जात आहे. देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे येथे जतन केले जाणार आहे.

.