Pune: पीटीआयचे अध्यक्ष विजय कुमार चोपडा यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – भारतातील मुद्रकांची पहिली संस्था असलेल्या दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले पंजाब केसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य संपादक आणि पीटीआयचे अध्यक्ष विजय कुमार चोपडा यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करीत गौरव करण्यात आला.

टोयो इंक इंडियाचे अध्यक्ष हरुहीको अकुत्सू सान, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिज्वी, हरियाणाच्या दिनबंधू छोटू राम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेंद्रकुमार अनायथ यांबरोबरच दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर, राहुल मारुलकर हे देखील उपस्थित होते.

नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन व दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघाचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ ,मानचिन्ह आणि मानपत्र देत चोपडा यांना गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा असलेल्या ‘शतमुद्रा’ या ग्रंथाचे प्रकाशन, गेली ८० वर्षे संस्थेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘मुद्रण प्रकाश’ या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आणि मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प व पाकिटाचेही अनावरण या कार्यक्रमात करण्यात आले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणा-या ‘शंभर पानांची गोष्ट’ या माहितीपट दाखविण्यात आला.

जीवनगौरव पुरस्काराबरोबरच मुद्रण क्षेत्रातील यशस्वी महिला व्यवसायिक एस. टी. रेड्डियार अँड सन्सच्या सारदा राजेंद्र यांचा पहिला ‘महिला व्यावसायिक पुरस्कार’ देत असोसिएशनच्या वतीने गौरव करण्यात आला. याशिवाय मुद्रण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या देशभरातील ८ व्यक्तींचा देखील सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

यामध्ये, दैनिक भास्करचे संचालक गिरीश अग्रवाल, मणिपाल ग्रुपचे टी. गौतम पै, टेट्रा पॅकचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष मनोहर, आयटीसी पॅकेजिंगचे सेंगुत्तवम्, प्रगती ऑफसेटचे हर्षा व हेमंत परचुरी, रेप्लीका प्रेसचे भुवनेश सेठ, जेएएक्स प्रीमियरचे खुशरो पटेल व अस्पी फोर्ब्ज आणि एमबीडी गृपच्या मोनिका मल्होत्रा यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी चोपडा यांनी दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन बरोबरच त्यांचा पुण्याबरोबर असलेल्या स्नेहबंधाला उजाळा देत आपल्या सभासद मुद्रकांना वाजवी दरात छपाईचे साहित्य पुरवीत पाठीशी उभे राहणा-या असोसिएशनचे कौतुक केले. तर, डॉ. मुजुमदार यांनी शंभर वर्षांत पदार्पण केलेल्या असोसिएशनचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छपाई ही मानवी संस्कृतीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत आज या क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे जागतिक स्तरावर ज्ञानाचा प्रसार होत असल्याचेही मुजुमदार यांनी यावेळी नमूद केले.

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने नजीकच्या भविष्यात मुद्रण क्षेत्राच्या क्रांतीची माहिती देणा-या, ५०० वर्षांचा मुद्रण कलेचा इतिहास, काळाप्रमाणे बदलत असलेले तंत्रज्ञान, आलेली स्थित्यंतरे, बदलत चाललेली मशिनरी, या विषयाशी संबंधित पुस्तके, छायाचित्रे, प्रदर्शनी यांचा समावेश असलेल्या संग्रहालयाची पुणे शहरात उभारणी करण्याचा मानस असल्याचे यावेळी रवींद्र जोशी यांनी सांगितले.

याशिवाय शास्त्री रस्त्यावर असलेल्या संस्थेच्या १० हजार स्केअर फूट जागेचे नुतनीकरण करीत त्या ठिकाणी एक ‘मुद्रण मॉल’ बनविण्याचे संस्थेचे स्वप्न असून या योगे मुद्रण व्यवसायिकाला एकाच छताखाली मुद्रणाशी संबंधित सर्व गोष्टी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

१९ मे १९१९ रोजी पुणे शहरातील २० ध्येयवादी मुद्रकांनी एकत्र येत मुद्रण क्षेत्राचा प्रसार, प्रचार व्हावा, नव्या तंत्रज्ञांनाची माहिती मुद्रकांना व्हावी या उद्देशाने दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनची स्थापना केली. मुद्रकांनी मुद्रकांसाठी व या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी स्थापन केलेली जगातील पहिली व सर्वांत जुनी संस्था. विशेष म्हणजे पुढे दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघ, महाराष्ट्र मुद्रण परिषद आणि पुणे जिल्हा मुद्रण संघ यांची स्थापना देखील दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनने केली. हीच संस्था आता आपली शंभरी साजरी करीत असून यानिमित्ताने शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.