Pune : लोकसहभागातून नद्या जलपर्णी मुक्त करणे शक्य- प्रदीप वाल्हेकर

एमपीसी न्यूज- फक्त कंत्राटे देऊन जलपर्णी नदीतून पुढे ढकलली जाते,पण नष्ट होत नाही. त्यासाठी लोकसहभागातून नद्या जलपर्णी मुक्त करणे शक्य असल्याचे मत पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते प्रदीप वाल्हेकर यांनी व्यक्त केले. जीविधा, निसर्गसेवक व देवराई फाऊंडेशनतर्फे ” जलपर्णी मुक्त,स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान” या विषयावर प्रदीप वाल्हेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

प्रदीप वाल्हेकर म्हणाले ,’ आपल्या देशातील सर्व नद्या जलपर्णी या विदेशी वनस्पतीने भरल्या आहेत. यामुळे एका बाजूला नदीपात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे तर दुसरीकडे डासांची संख्या वाढत आहे. जलपर्णी निर्मूलन हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे. फक्त कंत्राटे देऊन जलपर्णी नदीतून पुढे ढकलली जाते, पण नष्ट होत नाही.

आम्ही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन रोटरी आणि लोकसहभागातून जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे जीवनध्येय मानून अभियान सुरू केले आहे. स्वतःच्या खिशातून लाखो रुपये घालून आम्ही पवना नदी जलपर्णीमुक्त करण्याचे काम करत आहोत. नदी स्वच्छ ,प्रवाही ,निर्मळ ठेवण्याच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्त्यांची फौज याकामी उभी राहिली आहे. जलपर्णी पक्व होण्याआधी काढली तरच ती परत परत येणार नाही हे या अभियानाचे सुत्र आहे. या मोहिमेची माहिती व्याख्यानातून देण्यात आली .

जलपर्णी चे पुनरुत्पादन चक्र तोडणे हाच एकमेव उपाय असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले. पाण्यातील जलपर्णीला फुले ,फळे आली की हजाराच्या पटीत बिया नदीत पसरून जलपर्णीची भयानक वाढ होते. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि पवनेच्या काठच्या गावांना तेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी खर्च करावा लागतो. जलपर्णी नष्ट करण्याच्या बाबतीत पालिका प्रशासन, गावकरी यांच्यात जागृती घडवून एकत्रित कामाची गरज असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले. पवनेपाठोपाठ इंद्रायणी नदी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली .

धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जीविधा ‘चे संचालक राजीव पंडित,उष:प्रभा पागे, शैलेंद्र पटेल तसेच अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.