Pune : यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनास परवानगी नाही : अजित पवार

यावर्षीचा गणेशोत्सव पुणेकरांनी साधेपणाने साजरा करावा ; Public immersion of Ganesha is not allowed this year: Ajit Pawar

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. यावर्षीचा गणेशोत्सव पुणेकरांनी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास लाखो लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे परवानगी देता येणार नसल्याचे अजित पवार यांनी निक्षून सांगितले.

कोरोनामुळे अधिवेशनदेखील रद्द करण्यात आले आहे. हे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे.

त्यामुळे नागरिकांनी प्लाझ्मा दान करावे, यासाठी जनजागृती करा, अशी सूचनाही पवार यांनी केली.

पुणे व पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.