Pune : कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा : डॉ. दीपक म्हैसेकर

Public participation important for corona infection prevention: Dr. Deepak Mhaisekar :समन्वयाने संकटावर मात शक्य

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग  महत्वाचा असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासंबंधी सोमवारी पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख तसेच विशेष पोलीस अधिकारी यांची विधानभवनाच्या झुंबर हॉलमध्ये विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कोरोना संसर्ग उपाययोजना संनियंत्रण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तहसिदार विकास भालेराव, महापालिका उप आयुक्त अविनाश सकपाळ, माधव जगताप, सहा.आयुक्त् आशिष महाडदकर,सोमनाथ बनकर, दयानंद सोनकांबळे तसेच प्रमुख गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मंडळांमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोणत्याही संकटसमयी कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन मदत करण्याचा असतो.

सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरीकांना वेगवेगळया प्रकारची मदत या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली आहे. स्थानिक नागरिकांचा मंडळाच्या कार्यकर्त्यावर विश्वास असतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आव्हानांबाबत तात्काळ आणि प्रभावीपणे जनजागृती करता येणे शक्य होते.

त्यामुळेच त्यांचा सहभाग महत्तवाचा ठरतो. येणारा काळ हा प्रत्येकाची परीक्षा पहाणारा असणार आहे. त्यामुळे जनतेच्या समन्वयातूनच आपण परिस्थि्ती हाताळू शकतो. याकरीता जास्त जास्त गणेशमंडळाचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यावेळी या पदाधिका-यांमार्फत काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय साधनसामग्रीचा पुरवठा, विलगीकरणाकरीता जागा, बेड व वैद्यकीय अधिका-यांची सेवा पुरविण्याकरीता प्रशासनाला मदत करण्याचीही तयारी दर्शविण्यात आली.

कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य गणेशोस्तव मंडळांच्या कार्यकर्त्यांना असल्याचे आणि पहिल्या दिवसापासून याबाबत पोलीस, महानगरपालिका, प्रशासनाला मदत करण्यात आल्याचे सांगितले. यापुढील कालावधीमध्ये करावयाच्या मदतीविषयी प्रशासनाने सूचना केल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीच्या बैठकांमध्ये केलेल्या सूचनांबाबत विभागीय आयुक्तांकडून दखल घेण्यात आली व काही सूचनांवर तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांचे आभार मानले.

तसेच कोरोनाच्या संकटाच्या कोणत्याही आवाहनावेळी प्रशासनाबरोबर राहू, अशी ग्वाही दिली. विभागीय आयुक्त् डॉ.म्हैसेकर यांनी या कार्यकर्त्याच्या सकारात्मक भूमिकेबाबत त्यांचे कौतुक केले तसेच यापुढील काळात समन्वयाने हे संकट निभावून नेऊ, असा विश्वास व्यक्त् केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.