Pulgate: लाखो रुपयांचा ‘खाऊ’ आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज – पुुण्याच्या पूलगेेट भागातील एक खाद्यपदार्थांचे गोदाम आज (गुरुवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जाळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत या गोडाऊनमधील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतो. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे खाद्यपदार्थ भस्मसात झाले. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कॅन्टोनमेंट परिसरातील एका गोदामाला आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला मिळाली. त्यानंतर तातडीने या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. एका जुन्या लाकडाच्या घरात हे गोदाम होते. त्यात फरसाण, मिठाई यासारख्या पदार्थाचा साठा होता. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी बोलावून घ्याव्या लागल्या. गोदाम लाकडाचे असल्यामुळे आग चांगलीच भडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व बाजूंनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत या गोदामामधील सर्व साहित्य आगीत जाळून खाक झाले होते.

हे गोदाम भरवस्तीत आहे, मात्र सुदैवाने ही आग इतरत्र पसरली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत आगीत विझविण्यात यश मिळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.