Pune : पंक्चर झाल्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना जेलची हवा

एमपीसी न्यूज- दुचाकी पंक्चर झाल्याचे खोटे सांगत दुरुस्तीसाठी १८०० रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दुकानदारास त्याच्या साथीदारांसह जेलची हवा खावी लागली आहे. ही घटना सोमवारी (दि.17)जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

आशुतोष ऊर्फ बंटी रवींद्र येरल्लू (वय 35, रा.दापोडी) आणि सुमित सुरेश पाल (वय 20, रा.दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संकेत चंद्रकांत शिंदे (वय 26, रा.बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा आपल्या दुचाकीवर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोपोडीकडून शिवाजीनगरच्या दिशेने निघाला होता. खडकी परिसरातील जयहिंद थिएटरजवळ आले असता येरल्लू याने संकेतला थांबवून दुचाकीमधील हवा कमी असल्याचे सांगितले. त्यावर संकेतने समोरील एका पंक्चरच्या दुकानावर दुचाकी दाखवली. तेथील कामगार सुमित पाल याने चाकावर शाम्पू मिसळलेले पाणी टाकले त्यामुळे चाकातून बुडबुडे येताना दिसले. एवढेच नाही तर संकेतला त्यांनी 18 ठिकाणी पंक्चर असल्याचे सांगितले आणि त्यांनी संकेतकडून दुरुस्तीचे 1800 रुपये घेतले.

त्यानंतर संकेत तेथून निघाला आणि काही अंतर पुढे गेल्यावर संकेतला संशय आल्याने तो पुन्हा पंक्चरच्या दुकानात आला. त्याने त्या दोघांकडे पंक्चर बद्दल विचारपूस केली असता त्यांच्यात वादावादी झाली. त्यांनी संकेतला शिवीगाळ देखील केली त्यामुळे संकेतने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेची माहिती घेत खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी संबंधित पंक्चरच्या दुकानात जाऊन चौकशी केली असता त्या दोघांनी संकेतची फसवणूक केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे तसेच असा प्रकार आढळून आल्यास जवळील पोलीस ठाण्यात याची तक्रार द्यावी. फसवणूक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.