Pune : पुणे गारठले ! किमान तापमान 8.2 अंश सेल्सियस

एमपीसी न्यूज- उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि राज्यातील कोरडे हवामान यामुळे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सकाळच्या गुलाबी थंडीचा कडाका वाढत असून पुणे शहरात आज किमान तापमान 8.2 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. पुणे शहरातील या मोसमातील आत्तापर्यंतचे हे सर्वात नीचांकी तापमान आहे. त्यामुळे पुणेकर गारठून गेले आहेत.

पुणे शहरात गुरुवारी 12 अंश तापमान नोंदवण्यात आले होते. थंडगार वाऱ्यामुळे हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. आज, शुक्रवारी सकाळी तापमानामध्ये प्रचंड घट होऊन 8 अंशापर्यंत तापमान खाली घसरले. शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पारा घसरत असून सकाळपासूनच हवेत असलेला गारवा दुपारी देखील जाणवत आहे. तापमानामध्ये अचानक घट झाल्यामुळे कानटोपी मफलर स्वेटर घालून पुणेकर मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. रात्रभर चौकाचौकात नागरिक शेकोटी पेटवून उब मिळवत आहेत.

राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण भागात देखील तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी राज्यातील सर्वात कमीतापमान नाशिक इथे 9.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. महाबळेश्वरमध्ये तापमान 10.8 अंशांवर पोचले आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी भागांतही किमान तापमान सरासरीखाली आल्याने या भागात गारवा वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.