Maharashtra Politics News : भाजपाचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांत पाटील

काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असतील. : Pune: BJP MLAs are not in touch with NCP: Chandrakant Patil

एमपीसी न्यूज – काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असतील. याचा अर्थ हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असे नाही. तसेच भाजपचे कोणतेही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नसल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले.

भाजपात गेलेले काही आमदार घरवापसीसाठी इच्छुक आहेत. त्यांचा पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यांचा हा दावा चंद्रकांत पाटील यांनी आज खोडून काढला.

राजकारणात अनेकांचे जुने संबंध आहेत. त्यातूनच काही आमदारांच्या कामानिमित्त भेटी होतात. त्यामुळे कोणी लगेचच राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे, असे म्हणणे बरोबर नसल्याचेही पाटील यांनी सूचित केले.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची पुणे शहरातील करोनाच्या पार्श्‍वभूमीवर भेट घेतली. यावेळी पाटील यांनी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत जात नाहीत आम्हीच महाविकास आघाडीचे आमदार भाजपत आणणार आहोत, असा दावा केला.

महाविकास आघाडी सरकारकडून खुन्नस काढली जात असून आमच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामे होत नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काहीजण पसरवत आहेत. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

काही आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून राष्ट्रवादीत येण्यासाठी बोलणी सुरू आहे. ही चर्चा 6 महिन्यांपासून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.