Pune : धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना वाढीव पाणी का नाही?

एमपीसी न्यूज – यंदा निसर्गराजाने दमदार हजेरी लावून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला. हे पाणी साठविता येत नाही म्हणून तब्बल 20 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी सुरूच होती. सध्या खडकवासला, पानशेत टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीही पुणेकरांना वाढीव पाणीसाठा का दिला जात नाही ? असा सवाल निर्माण झाला आहे.

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यापूर्वी 20 दिवसांत भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस या कोणत्याही पक्षाला सत्तास्थापन करता आली नाही. त्याचा फटका पुणेकरांना बसला आहे. पुणे शहरात सुमारे 5 लाख लोकसंख्या ये – जा करते. महापालिका हद्दीलागतच्या ग्रामपंचायतींनाही पाणी द्यावे लागते. शिवाय 11 गावांचाही महापालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेला 16 टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली. त्यावर काहीही निर्णय होत नाही. 2020 पर्यंत केवळ 10.84 टीएमसी पाणी मंजूर केल्याचे आदेशात म्हटले आहे.

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तरी तातडीने पालकमंत्र्यांची निवड होऊन पुणेकरांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र झाले उलटेच ! 15 ऑक्टोबर पर्यंत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती पाणीसाठा शिल्लक आहे. त्यानुसार कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचा निर्णय घेतला जातो. पाण्याचे आताच नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.