Pune : मेट्रोमुळे शहराच्या शाश्‍वत विकासाला गती मिळेल- गिरीश बापट

एमपीसी न्यूज- सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरभर मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून शहराचा शाश्‍वत व गतीमान विकास होईल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या व्यापारी मेळाव्यात बापट बोलत होते.

महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, विशाल धनवडे, ऍड. मंदार जोशी, सुरेश धर्मावत, पल्लवी जावळे, उमेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बापट म्हणाले, “विकासकामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती काँग्रेस पक्षात नाही. त्यामुळे मेट्रोसारखा महत्त्वाचा प्रकल्प पंधराहून अधिक वर्षे रखडला. केंद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. रामवाडी ते शिवसृष्टी, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिंकाबरोबर शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला सादर केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे 195.26 किलोमीटरचे लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाव्यतिरिक्त आठ मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरभर मेट्रोचे जाळे विणले जाईल”

मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोमुळे 61 हजारांहून अधिक खासगी वाहने रस्त्यावर येणे कमी होऊन वार्षिंक १.२२ लाख टन इंधनाची बचत होईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना गतीमान व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मेट्रो प्रकल्प पर्यावरणस्नेही आहे. मेट्रो स्थानकांचाही बहुविध वाहतूक केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. व्यापारी संकुलांमुळे व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, विकासकामांना गती मिळणार आहे, असे बापट म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.