Pune : महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये तंबाखू, गुटख्याची ‘रंगपंचमी’

एमपीसी न्यूज- शहर स्वच्छतेसाठी नागरिकांकडून दंड वसूल करणाऱ्या पुणे महापालिकेतच अस्वच्छतेचा कळस झाला आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून महापालिकेच्या नव्या इमारतीमधील स्वच्छतागृहात, इमारतीच्या खिडकीमधून पानाच्या, तंबाखूच्या पिचकाऱ्या मारून सर्वत्र घाण निर्माण केली जात आहे. आता यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या खिडकीतून पिचकाऱ्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत. खिडकीपाशी थांबल्यावर किळस वाटत असल्याची तक्रार या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

या इमारतीमधील स्वच्छतागृहात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या टाकल्या जात आहेत. सर्वत्र घाण पसरली आहे. बेसिनचा पाइप गायब झाला आहे. यावरून येथील स्वच्छतेकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका संपूर्ण शहर स्वच्छ करायला निघाली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही जाहीर करण्यात आली. अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, महापालिकेत अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार का ? या इमारतीत मोठया प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तरीही, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

यासंदर्भात पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांच्याशी संपर्क साधला असता, अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like