Pune : पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

अडागळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. : Pune Crime Branch arrests a Tadipar criminal carrying a pistol

एमपीसी न्यूज – पिस्टल सारखे घातक हत्यार घेऊन फिरणा-या तडीपार गुन्हेगारास पुणे शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे.

सुरज ऊर्फ धनंजय नारायण अडागळे (वय 19, रा. महात्मा गांधी सोसायटी, पदमावती पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना रविवारी (दि. 16) माहिती मिळाली की, पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज अडागळे हा रामोशी गेट बसस्टॉप जवळ रस्त्यावर थांबलेला आहे.

त्याच्या कमरेला पिस्तुल लावलेले असून तो काही तरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून आरोपी सुरज याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व एक जिवंत काडतुस असा 40 हजार 200 रुपयांचा ऐवज आढळून आला.

पिस्टल, काडतुस जप्त करून त्याच्यावर आणि त्याचा मित्र महेश ऊर्फ मिट्या नवले (रा. पर्वती दर्शन पुणे) या दोघांविरुध्द समर्थ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्याराचा कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुरज अडागळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपी सुरज अडागळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहरामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पुणे पोलिसांनी त्याला 13 डिसेंबर 2019 रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.