Pune : जलपर्णी घोटाळ्याची लोकलेखा समितीमार्फत चौकशीची मागणी करणार – राधाकृष्ण विखे-पाटील

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या मार्फत जलपर्णी काढण्याच्या निविदेत कोट्यावधी रुपयाचा घोटाळयाप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकानी आंदोलन केले. त्या दरम्यान आंदोलनकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाची लोकलेखा समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

पुणे महानगरपालिके मार्फत जलपर्णी काढण्याबाबत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. त्या दरम्यान अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर अरविंद शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. पण रविंद्र धंगेकर यांना जामीन फेटाळल्याने त्यांना अटक झाली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संपूर्ण प्रकरणाबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, विधानपरिषद गटनेते शरद रणपिसे, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक यांनी जलपर्णी काढण्याबाबत कोट्यावधी रुपयांच्या निविदेच्या घोटाळ्या बाबत आंदोलन केले. यावेळी अधिकारी आणि नगरसेवक यांच्यात वादाचा प्रकार घडला. त्यानंतर एक अधिकारी लोकप्रतिनिधीच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. हे पाहून वाईट वाटले. जो काही प्रकार घडला तो दुर्दैवी होता. आम्ही दोन्ही बाजूचे समर्थन करीत नाही.

या घटनेचा शहर अध्यक्षकडून अहवाल मागविला असून दोषी आढळल्यास नगरसेवकवर पक्ष कारवाई करेल. पण, अशा मस्तवाल अधिकाऱ्याची चौकशी सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या घरी मध्यरात्री 30 पोलीस जाऊन त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. नेमका अरविंद शिंदे यांचा गुन्हा काय? हे पोलिसानी सांगावे. तसेच या घटनेतून सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करीत असून पोलीस देखील त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करीत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.