_MPC_DIR_MPU_III

Pune : जिल्ह्यातील चारही मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात येणा-या पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चारही लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजप, शिवसेना प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस तीन आणि काँग्रेस पक्ष एका मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे.

_MPC_DIR_MPU_IV

अशा होणार लढती

पुणे लोकसभा मतदारसंघातून युतीचे भाजपचे उमेदवार व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लढत होणार आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून बापट यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

_MPC_DIR_MPU_II

बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि युतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होणार आहे. कांचन या रासपचे दौंडचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या जवळच्या नातलग आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी असणार आहे. या दोन्ही मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून युतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात लढत होणार आहे. पार्थ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून युतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव आणि आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. आढळराव यांची चौथी निवडणूक आहे. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी त्यांना डॉ. कोल्हे यांच्या रुपाने तगडे आव्हान आहे. दुरचित्रवाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून घराघरात पोहचलेले कोल्हे या निवडणुकीत काही कमाल करतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या लढतीकडे मराठी सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे. या दोन्ही मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.