Pune : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने कार्यकर्त्यांना मिळणार संजीवनी

पुणे जिल्ह्यात अजित पवारांना मानणारा मोठा गट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा पुणे जिल्हा आहे. मात्र, अजितदादा यांचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातही एकहाती नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपसोबत अजित पवार गेल्याने पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मोठी संजीवनी मिळणार आहे.

पुणे शहरात निवडून आलेले आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागणार असल्याची चर्चा आहे. 2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पाच वर्षे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले होते.

2019 च्या निवडणुकीतही भाजप – शिवसेना महायुतीला जनादेश मिळाला होता. पण, या दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता आली नाही. काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीची स्थापना होण्याची चर्चा सुरू होती. निर्णय होत नसल्याने झटपट निर्णय घेत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते असल्याने त्यांच्याबरोबर 15 ते 20 आमदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या निर्णयाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.