Pune : पाय घसरुन घरातील टाॅयलेटमधे पडलेल्या ज्येष्ठ महिलेची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज- घरामध्ये एकट्याच असलेल्या ज्येष्ठ महिला पाय घसरुन घरातील टाॅयलेटमधे पडल्या. त्यामुळे त्यांना घराचा दरवाजा उघडता येत नव्हता. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल होत या महिलेची सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेत चिमण्या गणपतीजवळील एका तीन मजली इमारतीमध्ये घडली.

या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका 78 वर्षाच्या आजी पाय घसरून बाथरूममध्ये पडल्या. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच मुख्यालयातून एक पथक घटनास्थळी रवाना झाले. या ठिकाणी पोहोचताच जवानांनी टाॅयलेटमधे पडलेल्या आज्जींना दार उघङता येतय का याचा अंदाज घेण्यासाठी आवाज दिला असता अल्प प्रतिसाद मिळाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी दरवाजा न तोडण्याचा व क्षणातच जोखीम स्वीकारत टाॅयलेटच्या मागील बाजूस असणारी काच व लोखंङी गज कापून आज्जींना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सुमारे पंधरा ते वीस मिनिटात टाॅयलेटमध्ये प्रवेश केला व त्या दरवाजाची कङी काढून आजींची सुखरुप सुटका केली. आजींची तब्येत ठीक नसल्याचे जवानांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.