Pune : अग्निशमन दलाच्या जवानांकडून मांजामध्ये अडकलेल्या घार आणि कबुतराला जीवदान

एमपीसी न्यूज – पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मांजामध्ये अडकलेल्या घारीला आणि कबुतराला जीवदान दिले. या पक्ष्यांना सुखरूप वाचवण्यात आले असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीमध्ये व आंबील ओढ्याजवळ या घटना घडल्या.

पहिल्या घटनेत मयूर कॉलनी परिसरातील मोकाटे जलतरण तलावाच्या शेजारी असलेल्या एका विजेच्या खांबावर एक कबुतर मांजामध्ये अडकले असल्याची माहिती सकाळी साडेसात वाजता फायरमन नाईक यांना मिळाली. माहिती मिळताच फायरमन नाईक व त्यांचे सहकारी फायरमन संतोष भोसले, मनोज साळुंखे, फायरमन नितीन घुले तसेच चालक सुखराज दाभाडे यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विजेच्या खांबाजवळ अग्निशामक दलाची गाडी उभी करून गाडीवर चढून बांबूच्या मदतीने जवानांनी कबुतराची सुखरूप सुटका केली.

दुस-या घटनेत सकाळी साडेआठ वाजता दांडेकर पुलाजवळील आंबील ओढ्याजवळ एका कॉलनीमध्ये ऑइल सांडले असल्याची वर्दी अग्निशमन विभागाला मिळाली. फायरमन मारुती देवकुळे व फायरमन नागेश गसदले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऑइल सांडलेल्या ठिकाणी भुसा टाकला आणि त्यावर माती टाकण्यासाठी जवान गेले असता पतंगाच्या मांज्यात एक घार अडकलेली त्यांना दिसली. जवानांनी तात्काळ ४० फूट उंचीवर अडकलेल्या घारीला सुखरूपपणे काढले. दरम्यान, घारीला काढत असताना फायरमन मारुती देवकुळे यांना घारीने चावा घेतला. यामध्ये देवकुळे किरकोळ जखमी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.