Pune News : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ‘ड्राय डे’ घोषित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’ची घोषणा करण्यात आली आहे. आज (रविवारी, दि. 29) दुपारी पाच वाजता ड्राय डेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होणार आहे.

पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या प्रचाराची आज दुपारी पाच वाजता सांगता होणार आहे. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेच्या, निर्भय, निष्पक्षपाती वातावरणात व्हावी, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने ड्राय डे ची घोषणा केली आहे.

मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास अगोदर पासून (रविवारी, दि. 29 दुपारी पाच वाजल्यापासून, सोमवारी, दि. 30 दिवसभर), मतदानाच्या दिवशी (मंगळवारी, दि. 1 दुपारी पाच वाजेपर्यंत) आणि मतमोजणीच्या दिवशी (गुरुवारी, दि. 3) मद्यविक्री होऊ नये यासाठी ‘ड्राय डे’चे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या आणि इतर संबंधित अनुज्ञपत्या बंद ठेवण्याचे आदेश पुण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिले आहेत.

29 नोव्हेंबर दुपारी पाच वाजल्यापासून 1 डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ड्राय डे असेल. तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार आहे, त्या हद्दीतील दारू विक्री बंद असेल, असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.