Pune: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री निधीला – दीपाली धुमाळ

Pune: Honorarium of NCP's corporators to the Chief Minister Relief Fund - Deepali Dhumal

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे महानगर पालिकेतील सर्व नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी दिली. 

 पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेला राज्य शासनाकडून सर्व बाजूने मदत मिळत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन काम करीत आहे. काही ठिकाणी आरोग्यविषयक गोष्टींचा तुटवडा पडत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुणे महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व 42 नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन  सुपूर्द करणार आहोत, असे धुमाळ यांनी सांगितले.

एकूण 8 लाख 42 हजार रुपये मुख्यमंत्री निधीला देण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संदर्भात ज्या काही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, त्यासाठी आम्ही राज्यशासनाकडे जरूर पाठपुरावा करू. पुणे शहरात  कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल, याकडे महापलिका प्रशासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करावे, अशा सूचनाही दीपाली धुमाळ यांनी केल्या असून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी खात्रीही देण्यात आली.

भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान निधीला मदत करून राजकारण केले आहे. राज्य शासन कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेला चांगले सहकार्य करीत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी – काँग्रेस – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार असल्याने भाजपने पंतप्रधान निधीला मदत केल्याचा आरोपही दीपाली धुमाळ यांनी केला. तर, शिवसेनेच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्री निधीला मदत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.