Pune : रविवारपासून गुलटेकडी येथील मार्केटयार्ड सुरू होणार ; शेतकऱ्यांना दिलासा

Pune: Market yard at Gultekdi will start from Sunday; Consolation to the farmers

एमपीसी न्यूज – येत्या रविवारपासून ( दि. 31 मे) गुलटेकडी येथील मार्केटयार्ड पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. त्यामुळे शेतकरी, कामगार, आडते यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्केटयार्ड सुरू करताना काही अटीही घालण्यात आल्या आहेत.

शनिवार दि. 30 मे पासून 1 आडते, 1 वाहन याप्रमाणे रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. शेतीमाल गाळ्यावर खाली झाल्याबरोबर रिकामे वाहन बाजाराच्या बाहेर जाईल.

बाजार आवारातील शेतीमाल विक्रीची वेळ पहाटे 5 ते दुपारी 12 अशी राहील. बाजार आवारातील गाळ्याच्या बाहेरच्या बाजूंचे गाळेधारक आडते दि. 31 मे रोजी, तर आतील बाजूंचे आडते दि. 1 जून रोजी दिवसाआड पद्धतीने व्यापार करणार आहेत.

बाजार समितीने निर्धारित केल्याप्रमाणे आडते, कामगारांना ओळखपत्र तपासून गेट क्रमांक 1 आणि 4 ने प्रवेश दिला जाणार आहे. शेतीमाल घेऊन येणारी वाहने दुपारी 12 नंतर बाहेर काढण्यात यावी, शेतीमाल क्रेट आणि गोनिमध्ये आणावा, कोरोनाचा पार्श्वभूमीवर मास्क वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. केवळ आडत्यांनाच शेतीमालाची विक्री करता येणार आहे. निर्धारित केलेल्या वेळेतच शेतीमालाची विक्री करणे, घाऊक विक्री करणे बंधनकारक राहणार आहे.

दुबार आणि किरकोळ विक्री करता येणार नाही. बाजार आवारात रिकामी वाहने उभी करू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासकांनी दिला आहे.

तसेच, ओळखपत्र जप्त करून कायमस्वरूपी प्रवेश नाकारला जाणार आहे. अशा अनेक अटी घालून येत्या रविवारपासून मार्केटयार्ड सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.