Pune : कोरोना हॉटस्पॉट असलेल्या पुणे – मुंबईत दारु विक्री बंदच ठेवा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पुणे – मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने दारू विक्री बंदच राहावी. दारू काही जीवनावश्यक वस्तू नाही, असे सांगून भाजपचा दारू विक्रीला विरोध असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.

नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणा-या भारतीय जनता पक्षाच्या व पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह ३ हजार जणांना पाटील यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, केवळ पुण्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेली दारुविक्री ही घातक आहे. दारुसाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठया रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. सगळेजण घरामध्ये एकत्र असल्याने यापूर्वीच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात दारुच्या बाटल्या घरात आल्या की आणखी अडचणी निर्माण होत आहेत.

दारू विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, दारु विक्री बंद करायला हवी. दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मुंबई, पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट असताना येथे व संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या लढाईत सामान्य माणसांप्रमाणे राजकीय पक्षाचे आणि गणेशोत्सव मंडळाचे कायकर्ते देखील जगले पाहिजेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर्स, पत्रकारांना नगरसेवक हेमंत रासने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित केले आहे.

कार्यकर्ता हा देखील कोरोना वॉरिअर आहे. तो रस्त्यावर उतरुन गरजूंना किराणा, मास्क वाटतोय. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत: किंवा दानशूरांकडून रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा काढायला हवा, असेही पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. या काळात प्रत्येक कार्यकर्ता गरजूंसाठी कार्यरत आहे. विद्यार्थी, प्रवासी, मजूर, हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी भाजपाने व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ किलो किटमध्ये २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देऊन करण्याचा आम्ही संकल्प केला. त्याची सुरुवात झाली असून हे कार्यकर्ता सन्मान किट या कार्यकर्त्यांपर्यंत टप्याटप्याने पोहोचविण्यात येणार आहे.

हेमंत रासने : अध्यक्ष- स्थायी समिती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.