Pune : पोलिसांचा वचक कमी झालाय का ? सर्वसामान्यांना पडला आहे प्रश्न !

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसातील घडामोडी पाहता पुण्यात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात गुंडांच्या दोन गटात झालेल्या वादात दोन खून झाले, तर एक खुनाचा प्रयत्न झाला. तडीपार गुंडही बिनदिक्कत शहरात फिरताना आढळून येतात. दोन दिवसांपूर्वी जनता वसाहत परिसरातील घटना हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही का? पोलिसांचा वचक कमी झालाय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शहरात काही वर्षांपूर्वी बापू नायर, बाबा बोडके, निलेश घायवळ, गजा मारणे यांच्यासह अनेक टोळक्यांची दहशत होती. या टोळक्यांची दहशत पोलिसांनी मोडीतही काढली. तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडत अनेकांवर एमपीडीए, तडीपारीच्याही कारवाई करण्यात आल्या होत्या.

परंतु मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांनी आणखी डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. रात्री अपरात्री तलवारी मिरवत वाढदिवस साजरा करणे, पोलिसांना मारहाण करणे, सराईत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. यातील अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभागही मोठा आहे. अनेक गुंड तडीपारीला न जुमानता बिनदिक्कत शहरात फिरतात. त्यामुळे पूर्वी असलेला पोलिसांचा वचक कमी झाला की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.