BNR-HDR-TOP-Mobile

Pune : व्यसनमुक्त शहरासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील – डॉ. के. व्यंकटेशम

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – छोट्या कुटुंब पद्धती आणि आपल्यापुरतेच पाहणाऱ्या काळामध्ये सामाजिक कार्य उभारणे आणि दुसऱ्याची सेवा करणे कठीण काम असते.डॉ. अनिल अवचट, मेधा कुलकर्णी आणि सूर्यकांत कुलकर्णी यांच्यासारखे मोजकेच लोक इतरांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. अशा लोकांकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यातूनच प्रेरणा घेत आम्ही पुणे शहराला व्यसनमुक्त बनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गणेशोत्सव मंडळांनीही सामाजिक कार्यात आपला सहभाग वाढवावा, असे प्रतिपादन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दिल्या जाणार्‍या ग्रामदेवता पुरस्कारांचे वितरण डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार माधुरी मिसाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

  • यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल अवचट, मेक माय ड्रीम फाउंडेशनच्या संस्थापिका मेधा कुलकर्णी आणि परभणीतील सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी यांना ग्रामदेवता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 11,111/- रुपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे आणि योगेश समेळ, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. व्यंकटेशम म्हणाले, सुरक्षा आणि चांगली सेवा पुरविण्यासाठी पोलीस प्रशासन काम करीत असते. आपल्या कामात सतत सुधारणा होत राहणे गरजेचे असते. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून विविध योजना राबविण्यात येतात. जेणेकरून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि चांगली सेवा देता येईल. गेल्या काही काळात सेवा विभागाने एक लाख नऊ हजार लोकांच्या तक्रारींवर अभिप्राय घेतले आहेत. त्यातून त्यांना विश्वास देण्याचे काम पोलीस करताहेत. शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून गेल्या वर्षात ३३ टक्क्यांनी हे अपघात कमी झाले आहेत. बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि ज्येष्ठाना दिलासा देण्यासाठी भरोसा सेल काम करीत आहे.गणेशोत्सव मंडळांनीही पोलिसांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे.

  • डॉ. अनिल अवचट म्हणाले, “छोटी मुले व्यसनाधीन होत असून त्याचा वयोगट कमी होतोय. हे चित्र निराशाजनक आहे. पण, व्यसनमुक्तीचे काम सुरू ठेवले. या कामात कुटूंब, त्यांच्या वस्तीतल्या लोकांचे सहकार्य मिळाले. व्यसनमुक्तीच्या कामाला पु. ल. देशपांडे यांची मदत मिळाली. अनेक बायका नवऱ्याचा त्रास विसरून व्यसनमुक्तीसाठी आमच्याकडे येतात. येथे आलेले रुग्ण बरे होऊन चांगला माणूस बनतात. त्यावेळी केलेल्या कामाचे चीज झाल्याचा आनंद असतो.

यावेळी माधुरी मिसाळ म्हणाल्या, तांबडी जोगेश्वरी आणि माझे नाते जुने आहे. समाजात चांगले लोक आहेत. त्यामुळेच पृथ्वीचा समतोल राखला जात आहे. किमान एकाला तरी मदत करावी हा चांगला विचार घेऊन अनेक लोक काम करताहेत. गणपती मंडळांची ताकद मोठी आहे. त्याचा सदुपयोग करायला हवा. गणपती मंडळांनी नवीन पिढीला सोबत घेऊन विधायक कामांवर भर दिला, तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील.

  • मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुरस्कारामुळे आम्हाला नेहमी ऊर्जा मिळते. दिव्यांग मुलांसाठी काम देणारी यंत्रणा नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना प्रचंड अडचणी येतात. आम्ही करत असलेल्या कार्यासाठी कोणतीही सरकारी मदत न घेता हे काम सुरू आहे. समाजातील अनेक नागरिक आम्हाला मदत करतात. त्यामुळे अनेक प्रश्न सुटत आहेत. या मुलांना लहान वयापासूनच स्वावलंबी बनवत आहोत. त्यामुळे या मुलांना आर्थिक मदतीपेक्षा योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

त्यानंतर सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले, अपंग मुलांच्या शाळेसाठी शासनाने वेगळी तरतूद केली आहे. यामुळे ही मुले इतरांमध्ये मिसळली जात नाहीत. हा त्यांच्यावर अन्याय असून, हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे शासनाने वेगळी व्यवस्था न करता सामान्य मुलांबरोबरच त्यांना शिक्षण द्यावे. तरच ते समाजाच्या प्रवाहात येतील. प्रत्येक जण स्वतःसाठी जगत आहेत. या जगण्याला कोणत्याही अर्थाने नाही. त्यामुळे प्रत्येकांनी समाजाचे काहीतरी देणे लागतो, असे समजून कार्य केले पाहिजे.”

  • मंडळाचे विश्वस्त अनिरुद्ध गाडगीळ यांनी ‘ग्रामदेवता पुरस्कार’मागील भूमिका मांडली. सहकार्यवाह सौरभ धडफळे आणि सचिव ऋषीकेश नेऊरगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशांत टिकार यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रसाद पटवर्धन यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

HB_POST_END_FTR-A2

.