Pune : कर्णबधीर आंदोलकांच्या मोर्चावर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज

लाठीचार्ज करण्यामागचे कारण अस्पष्ट; संतप्त विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरु

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांसाठी मुंबईला निघालेल्या कर्णबधीर आंदोलकांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. मात्र, नेमक्या कुठल्या कारणाने लाठीचार्ज करण्यात आला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

पुण्यातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयापासून ते विधिमंडळ अधिवेशनापर्यंत हे कर्णबधीर नागरिक त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार होते. या मोर्चात सुमारे हजाराहून अधिक कर्णबधीर सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र, नेमक्या कुठल्या कारणाने लाठीचार्ज करण्यात आला याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

  • मागण्या सांगताना मोर्चेकरी म्हणाले की, महाराष्ट्रात १८ लाख कर्णबधीर आहेत. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. मुळात आम्ही अपंग किंवा अंध नसून कर्णबधीर आहोत. आमची भाषा समजू शकणारे लोक खूप कमी आहेत. आम्ही इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार असताना भाषेचा अडसर असल्याने आम्हाला घेता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र भाषा दुभाजक देण्याची तयारीही दाखवली जात नाही.

सरकार अनेक बाबीत अपयशी ठरत असून केवळ आश्वासन देत आहे. त्यामुळे आता याला कोणही भुलणार नाही. आपल्या मागण्या सरकारकडे मागण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन केली जात आहेत. मात्र, ही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे का? असा प्रश्न या लाठीचार्जवरून पडत आहे. या आंदोलकांनी सरकारपुढे मागण्या मांडण्यासाठी मोर्चा काढला होता. यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे याबाबत सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

पुणे येथे कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज संदर्भातचा संबंधितांकडून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • या आहेत मागण्या :
    # ज्या पद्धतीने कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्याचा या विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. सांकेतिक भाषेतून शिक्षण द्यावे.
    # सांकेतिक भाषा हा आमचा अधिकार आहे. हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे.
    # कर्णबधिर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत. त्यामुळे याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशा आदी मागण्या आहेत.

कर्णबधिर आंदोलकांचा या सरकारला शाप बसेल – राज ठाकरे, अध्यक्ष मनसे
दुर्दैवी गोष्ट आहे ही. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशा लोकांवर तुम्ही लाठीचार्ज करता. कुणी दिले हे आदेश?. हा इथल्या पोलिसांचा विषय नाही, त्यांना आदेश देणाऱ्यांचा हा विषय आहे. ज्यांनी त्यांना आदेश दिले आहेत, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यावा. कर्णबधीर मुलांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या सांकेतिक भाषेत त्यांना शिक्षण घ्यायचे आहे. जर मुख्यमंत्री सांगूनही कोणी अधिकारी ऐकत नसतील तर या सरकारचा उपयोग काय?. या मुलांवर जो लाठीचार्ज झाला आहे, याचा या सरकारला नक्की शाप बसेल. या सरकार याच्याशी काहीही घेणं देणं नाही. केवळ पैशाने निवडणूक जिंकणे एवढाच येथे सुरु आहे. या सरकारला पहिल्या सरकारवर टीका करायचा काहीही अधिकार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.