Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खर्चाची माहिती तीन दिवसांत द्या

महापौरांचे प्रशासनाला आदेश ; विरोधी पक्ष आक्रमक : Pune: Provide information on Corona's background expenses within three days

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिन्यांत केलेल्या खर्चाची माहिती सर्व नगरसेवकांना तीन दिवसांत घरपोच द्या, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) पुणे महापालिका प्रशासनाला दिले.

कोरोना संदर्भात केलेल्या खर्चाच्या तपशिलाबाबत पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे चांगलीच आक्रमक झाली होती. कोरोना खर्चाबाबत पाच महिने झाले खुलासा होत नाही, प्रशासनाची वकिली का करता, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

ऑनलाइन सभेत घरून सहभागी असलेल्या नगरसेवकांना सभेत नेमके काय सुरु आहे ते कळतच नव्हते. जवळपास अर्धा तास गोंधळ सुरू होता. या सभेत सर्वच नगरसेवक एकावेळी बोलत असल्याने गोंधळ उडाला होता.

कोरोनाच्या संकटामुळे 4 ते 5 महिन्यापासून पुणे शहर व्हेंटिलेटरवर आहे. मात्र, प्रशासन काहीही काम करीत नसल्याचा हल्लाबोल माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी केला.

तर कोरोनाचे संकट वाढत असताना सत्ताधारी आणि म्हपालिका प्रशासन नेमके काय काम करते, असा सवाल विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला.

माजी उपमहापौर दिलीप बराटे, नगरसेवक विशाल तांबे, महेंद्र पठारे, अशोक कांबळे, प्रकाश कदम, योगेश ससाणे, बाबुराव चांदेरे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या डायससमोर येऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचारणा केली.

तर, कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने पुणेकरांना वाऱ्यावर सोडू नका, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली.

त्यावर मागील साडेचार महिन्याचा कोरोना अहवाल तीन दिवसांत सर्व सभासदांच्या घरपोच देण्यात यावा, असे आदेश प्रशासनाला दिले. या आदेशाचे भाजपच्या सत्ताधारी नगरसेवकांनी बाके वाजवून स्वागत केले.

दरम्यान, या अहवालात आतापर्यंत काय केले, पुढे काय करणार आहात, किती खर्च झाला, याचा स्पष्ट उल्लेख करण्यास सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.