Pune : महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेत पुणे प्रादेशिक विभाग अव्वल; महावितरणचे 40 हजार ग्राहक बनले पर्यावरणस्नेही

एमपीसी न्यूज – विजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ या पर्यावरणपुरक योजनेत 1 लाख 3 हजार 918 वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये पुणे प्रादेशिक विभाग अव्वल असून विभागातील 40 हजार 69 ग्राहकांनी यात सहभाग घेतला आहे.

महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रत्येक बिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय विजबिल ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध होत आहे.

वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय देखील उपलब्ध आहे. यासोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करता येते.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे प्रादेशिक विभागातील 40 हजार 69 ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक विभागात 37 हजार 800, नागपूर प्रादेशिक विभागात 13 हजार 717 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील 12 हजार 332 विजग्राहकांचा समावेश आहे. परिमंडलनिहाय पर्यावरणस्नेही ग्राहकांमध्ये पुणे परिमंडल (24975), बारामती (8330), कोल्हापूर (6764), नागपूर (4249), गोंदिया (1288), चंद्रपूर (1414), अमरावती (2927), अकोला (3839), नाशिक (10583), कोकण (2161), कल्याण (10132), जळगाव (5394), भांडूप (9530), औरंगाबाद (5310), लातूर (4035), नांदेड (2987) येथील वीजग्राहकांनी विजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देऊन पर्यावरणपुरक कामात योगदान दिले आहे.

‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर उपलब्ध आहे. विजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.