Pune : ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ म्हणत तृतीयपंथीयांसाठी धावले पुणेकर

एमपीसी न्युज – ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ असा सामाजिक संदेश देत 1300 पुणेकर पुणे रनिंग मॅरेथॉन मध्ये रविवारी सकाळी धावले. या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ धावपटूंबरोबर लहान गटातील मुलांचा सहभाग लक्षवेधी होता.

पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन संस्थे अंतर्गत लास्ट संडे ऑफ मंथच्या वतीने पुणे रनिंग मॅरेथॉन रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. मॅरेथॉन वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर या सामाजिक संदेश व संकल्पनेवर आधारित होती, ‘तृतीयपंथीयांना देऊ माणुसकीचा हात या चळवळीत लाभू दे सगळ्यांची साथ’ असा संदेश देत 1300 पुणेकर धावपटूं मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.

पुणे पीपल्स को-ऑप बँक अध्यक्ष जनार्दन रणदिवे, अ‍ॅपलॉड एनजीओच्या कार्यकर्त्या अनुजा वाघोलीकर व अनुराधा वाघोलीकर आणि तृतीयपंथी सोनाली दळवी, संतोषी कदम यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ झाले. रमणबाग शाळा, शनिवार पेठ येथून पहाटे पावणेसहा वाजता ही मॅरेथॉन सुरु होऊन साडेसहा वाजता संपली. या मॅरेथॉनचे पेठ ग्रुपने नेतृत्व केले. मॅरेथॉन अंतराची श्रेणी ३ किमी , ५ किमी , आणि १० किमी अशी होती. केवळ सहभागीच नाही तर प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्याही लक्षणीय होती.

पुणे येथील अ‍ॅपलॉड ही स्वयंसेवी संस्था तृतीयपंथीयांना सक्षम करणे, प्रेरणा देणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करण्यासाठी कार्यरत आहे. ‘पुणे रनिंग’ च्या या मॅरेथॉनच्या संकल्पनेमुळे ‘तृतीयपंथीबद्दल भेदभाव करण्याऐवजी त्यांना सामाजिकरित्या स्वीकारू या आणि त्यांनाही आपल्या समाजाचा भाग बनवू’ असा संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे, असे अनुजा वाघोलीकर आणि अनुराधा वाघोलीकर यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.