Pune : पुण्यात जून महिन्यात वाढले 10 हजार पेक्षा जास्त रुग्ण; चाचण्यातही झाली वाढ

Pune saw an increase of more than 10,000 patients in June; There was also an increase in testing

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात एकट्या जून महिन्यात 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. सध्या दररोज 500 च्यावर रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी एका दिवसात सर्वाधिक 877 रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या दररोज 4 हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. पुणे महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या केवळ अर्ध्या तासातच कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कळणारी टेस्ट करण्यात येत आहे. अशा एक लाख टेस्ट करण्यात येणार आहेत.

त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट केल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करता येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

राज्य शासनातर्फे लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जून महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत साडेसहा हजार रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. सध्या पुणे शहरात 18 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण गेले आहेत. सध्या शहरात 6 हजार 403 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जुलै महिना अखेरीस कोरोनाचे 48 हजार रुग्ण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 19 हजार 596 खाटांची आवश्यकता भासणार आहे.

ऑक्सिजनची सुविधा असलेल्या 1960 खाटा, 980 आयसीयू खाटा, तर, 490 व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेला आणखी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. येत्या 15 दिवसांत 37 हजार 856 रुग्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.