Pune : पुण्यातील शाळांतही आता होणार वॉटर बेल – नगरसेविका खर्डेकर यांचा विषय मान्य

एमपीसी न्यूज – खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात शालेय विद्यार्थी कमी पाणी पितात. पाणी कमी प्यायल्याने शालेय विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर पुणे मनपाच्या सर्व शाळांमध्ये तसेच खाजगी शाळांमध्ये सुद्धा ठराविक काळानंतर मुलांना व शिक्षकांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजविण्यात यावी, असा प्रस्ताव नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महिला व बालकल्याण समितीत दाखल केला होता.

आज महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत सदर विषयास मान्यता देण्यात आली. यानुसार आता सर्व शाळांमध्ये वॉटर बेल वाजविली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वांनीच पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र कमी पाणी पिण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांमध्ये जास्त असल्याने आता या ठरावामुळे या समस्येच्या निराकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याने समाधान वाटते असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.